*आमदार रोहित पवार यांनी घेतली मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे भेट*
*कुकडीचे अतिरिक्त पावसाळी आवर्तन मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांची चंद्रकांतदादा पाटील यांना विनंती*
कर्जत | कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या कुकडी डाव्या कालव्यावर कर्जत तालुक्यातील 54 गावे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. अशातच खरीप हंगामातील आवर्तन नुकतेच पूर्ण झाले असून आवर्तन कमी दाबाने असल्याने काही गावातील लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचले नाही. शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत पाणी पोहोचावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेतली आहे.
आमदार रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन यंदा शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेता एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सोडण्याबाबत विनंती केली आहे. करपडी, काळेवाडी तलाव, येसवडी तलाव, थेरवडी तलाव, दुरगाव तलाव, राक्षसवाडी तलाव, करमणवाडी, चौंडी, दिघी येथील शेतकरी अजूनही पाण्यापासून वंचित राहिले आहेत. तसेच सीना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी असल्याने धरणातील पाणी पातळी देखील कमी झाली आहे. त्यामुळे सीना धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडूनही कुकडी प्रकल्पातून भोसेखिंड येथून पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही बाब आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदय यांच्या लक्षात आणून दिली.
सध्या कुकडी धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे आणि धरणाची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे आवर्तन सुरू करता येऊ शकते तरी कर्जत तालुक्यातील कुकडी व सीना कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व ओलिताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी आणि पिण्याची पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सोडण्याची विनंती आमदार रोहित पवार यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सोडून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आणि मुबलक पाणी उपलब्ध करून देण्याचे काम आमदार रोहित पवार यांनी केले होते. तसेच यंदाही अतिरिक्त आवर्तन सुटावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी खरीप हंगामातील सुरू असलेल्या आवर्तनाची तारीख वाढवावी यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले होते आणि सरकारने त्याची दखल घेत आवर्तनाची तारीख वाढवून दिली होती. आता एक अतिरिक्त आवर्तन सोडण्याबाबत सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
*प्रतिक्रिया* –
माझ्या मतदारसंघासाठी महत्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे खरीप हंगामातील आवर्तन नुकतेच पूर्ण झाले असून आवर्तन कमी दाबाने असल्याने काही गावातील लाभार्थी पाण्यापासून वंचित राहिले आहेत. माझ्या मतदारसंघातील कुकडी व सीना कालव्यावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने एक अतिरिक्त पावसाळी आवर्तन सुरू करण्याबाबत आदेश द्यावे, अशी विनंती कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना भेटून केली. सध्या कुकडी धरण क्षेत्रामध्ये पाऊस सुरू आहे आणि धरणाची पाणी पातळीसुद्धा वाढली आहे. त्यामुळे आवर्तन सुरू करता येऊ शकते, याबाबत भेटीत सकारात्मक चर्चा झाली. मविआ सरकारच्या काळात आपण शेतकऱ्यांना एक अतिरिक्त आवर्तन मोफत देऊन दिलासा देत मुबलक पाणी देखील उपलब्ध करून दिले होते. नुकत्याच संपलेल्या खरीप हंगामातील आवर्तनाची तारीख वाढवून मा. चंद्रकांतदादांनी मदत केली होती. त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा झाला. यंदाही ते मदत करतील अशी अपेक्षा!
– *रोहित पवार*
(आमदार कर्जत जामखेड)