मोहरी तलाव फुटण्याचा धोका टळला! आमदार रोहित पवार यांच्या तत्परतेने संकटावर मात

मोहरी तलाव फुटण्याचा धोका टळला! आमदार रोहित पवार यांच्या तत्परतेने संकटावर मात

स्वखर्चातून दिली पोकलँड, जेसीबी आणि हजार गोणी सिमेंटची मदत; गावकऱ्यांना दिलासा

जामखेड-

जामखेड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाच्या सांडव्यात मोठं भगदाड पडून पाणी वाहू लागल्याने तलाव फुटण्याचा गंभीर धोका निर्माण झाला होता. या धोका टाळण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी वेळ न दवडता स्वतः पुढाकार घेत तातडीने स्वखर्चातून मदत पुरवली.

कालव्याच्या सांडव्यात खच झाल्यानं तलावाचं पाणी परिसरातील सोनेगाव, धनेगाव, चिंचपूर, जवळके, तरडगाव या गावांकडे झेपावण्याची शक्यता होती. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार रोहित पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली, पाहणी केली आणि प्रशासनाकडं साधनसामग्री उपलब्ध नसल्याने स्वतःच्या खर्चातून तीन पोकलँड, जेसीबी तसेच एक हजार गोणी सिमेंटची व्यवस्था करून कामाला सुरुवात केली.

तलाव सुरक्षित ठेवण्यासाठी सध्या तातडीचे दुरुस्तीचे काम सुरू असून पावसाने उघडीप दिल्याबरोबर प्रशासनाच्या मदतीने कायमस्वरूपी दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार आहे.

मोहरी, खर्डा, जायभायेवाडी या गावांसाठी पाणीपुरवठ्याचं प्रमुख साधन म्हणजे हाच मोहरी तलाव. त्याचबरोबर खालील गावांतील शेतीही याच तलावावर अवलंबून आहे. जर हा तलाव फुटला असता तर नागरिकांपुढं पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आणि शेती वसाहतींवर पूराचा मोठा धोका निर्माण झाला असता. त्यामुळे नागरिकांनी काळजी करू नये. तलाव सुरक्षित राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. प्रशासन आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने हे काम तातडीने पूर्ण केलं जाईल अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page