नान्नज प्रकरणात परस्परविरोधी दुसरी फिर्याद दाखल…
१० जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल…
जामखेड प्रतिनिधी –
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपी वैभव साबळे याने साळवे यांच्यासह १० जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. नान्नज प्रकरणात परस्परविरोधी दुसरी फिर्यादी दाखल झाली आहे.२४ ऑगस्ट रोजी रात्री आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांच्या कुटुंबातील सदस्यांवर एका टोळक्याकडून सशस्त्र हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणात ७ जण जखमी झाले होते. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला १४ जणांविरोधात खुनाचा प्रयत्न करणे आणि ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. घटनेनंतर या प्रकरणात वैभव साबळे सह एकुण ६ आरोपींना आज अखेर अटक करण्यात आली आहे. पोलिस कोठडीत असलेल्या वैभव साबळे याने सुनिल साळवे यांच्यासह १० जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.
वैभव विजय साबळे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २४ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास मी व माझा मित्र अभय राजे भोसले असे दोघेजण साईनाथ पानटपरी वर बसलो होतो. त्यावेळी आमच्या गावातील दिग्वीजय आबु सोनवणे हा पानटपरीजवळ आला आणि तो अभय सोबत भांडु लागला. त्यावेळी मी त्या दोघाचे भांडण सोडवले. त्यानंतर दिग्विजय याने यशदिप संपत साळवे यास फोन करुन बोलावुन घेतले. त्यावेळी यशदीप सोबत अभिजित संपत साळवे, सतिष अजिनाथ साळवे, अरविंद भालेराव, सद्दाम पठाण, आदर्श साळवे हे सर्वजण हातात कोयता, लोखंडी गज, बांबु असे घेऊन आले.दिग्विजय याच्या सांगण्यावरुन अभय राजे भोसले यास मारु लागले. त्यावेळी मी सोडवासोडव करत असताना अभिजित संपत साळवे यांने त्याचे हातातील कोयत्याने माझ्या पाठीवर मारले. तसेच अरविंद भालेराव याने माझे मांडीवर कोयता मारला. तसेच आदर्श सुनिल साळवे याने पाठीवर कोयता मारला. तसेच सद्दाम पठाण याने माझे खिशातील २ हजार रूपये व सतिष साळवे याने माझ्या गळ्यातील सोन्याची चैन भांडणात काढुन घेतली असावी.
त्यानंतर त्याचे घरातील महिला आल्या व माझे पानटपरीवर दगड फेकायला चालु केले. त्यावेळी मी व अभय राजे तेथून निघुन गेलो. त्यानंतर काही वेळाने मी टपरीवर पाहीले असता माझे टपरीमधील फ्रिज, मोबाईल व इतर साहीत्याची नासधुस झालेली दिसली. तसेच मी माझ्या काउंटरच्या गल्ल्यात ठेवलेली रोख रक्कम ४ हजार रुपये मला दिसुन आले नाही.त्यानंतर मी घरी गेलो असता माझे वडीलांनी मला सांगितले की, सुनिल साळवे हा हातात बंदुक घेउन आला होता. व अभिजित साळवे हा कोयता घेऊन आला होता. रतन साळवे हा हातात बांबु घेऊन घरासमोर आरडाओरडा करत होते व मला मारणार असे म्हणुन शिवीगाळ करत होते. त्यानंतर ते सर्वजण त्यांच्या बोलेरो गाडीत निघुन गेले. त्यानंतर मी माझ्या वडीलांच्या मोबाईल फोन वरुन डायल 112 ला भांडण झाले असे फोन करुन सांगितले होते, असे फिर्यादीत नमुद आहे.३१ ऑगस्ट रोजी वैभव साबळे याने दिलेल्या फिर्यादीवरुन
यशदिप साळवे,
अभिजीत संपत साळवे,
सतिष साळवे,
अरविंद भालेराव,
आदर्श साळवे,
सद्दाम पठाण,
सुनिल साळवे,
अभिजीत साळवे,
रतन साळवे,
अश्या दहा जणांविरोधात विविध गंभीर कलमान्वये जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संजय लोखंडे हे करत आहेत.