निमीत्त
9-1 3 ऑक्टोबर
राष्ट्रीय डाक सप्ताह
डिजिटल काळातही टपाल सेवे वरील विश्वास कायम
जामखेड प्रतिनिधी,
केवळ पत्र पोहोचविणे एवढ्यापुरतेच मर्यादित न राहता भारतीय टपाल खात्याने बदलत्या काळानुसार आधुनिकतेची कास धरत बँकिंग, विमा या क्षेत्रातही घट्टपणे पाय रोवले आहेत. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात कॉम्प्युटर आणि मोबाइलवरून संदेशवहन काही सेकंदात जगाच्या कोना कोपऱ्यात पोहोचवणारी प्रणाली उपलब्ध असली तरी आजही महत्त्वाची कागदपत्रे, पेन्शन पोहोचवण्याचे काम पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पार पाडले जात असल्याने नागरिकांचा टपाल सेवे वरील विश्वास कायम आहे. ग्रामीण भागात आजही टपाल सेवा उत्तम कार्य करीत असून, बदलत्या काळाबरोबरच टपाल सेवाही अपडेट होत आहे.
एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा.
एकेकाळी पोटामध्ये असंख्य गुपितांचा खजिना भरून प्रत्येकाच्या सुख दुःखाची साक्षीदार असणाऱ्या आपल्या गावागावातील टपालपेट्या आता कालबाह्य होऊ लागल्या आहेत. सध्या सोशल मीडियामुळे जग झपाट्याने गतिमान होत आहे. पत्रांची जागा मेल, मेसेजेस ऑनलाइन पोस्टलने घेतली आहे. मात्र, पत्रात हाताने लिहिलेल्या भाव भावनांची सर त्याला कधीच येणार नाही.
एकेकाळी प्रत्येकाची सुख-दुःखे भावनांच्या साक्षीदारच असणाऱ्या व उभं आयुष्य असंख्य गुपिते पोटात सामावून घेणाऱ्या टपाल पेट्या मात्र आता इतिहासजमा होऊ लागल्या आहेत. असे असले तरी टपाल खात्याने नव्या तंत्रज्ञानाची कास धरली असून बदलत्या जमान्यात नागरिकांना अपडेट आणि फास्ट सेवा मिळत आहे.
एक काळ असा होता की पत्रांनी पेटी भरून जायची. सणांची सुरुवातही पत्रांनीच सुरू व्हायची. रेशीम धाग्यामधील बहिणीने भावासाठी खरेदी केलेली राखी असेल, संक्रांतीमध्ये पाठवलेले तीळगूळ असतील, दसरा-दिवाळीच्या शुभेच्छा असतील, लपवत लपवत गुलाबी पत्र घेऊन येत असलेली प्रेयसी असेल किंवा जवानांसाठी त्याच्या पत्नीने लिहिलेले पत्र असेल, कोणत्या तरी बँकेची नोटीस घेऊन आलेला कारकून असेल, जवानांसाठी आलेली तार असेल किंवा वडिलांना आईने लिहिलेले पत्र टाकायला आलेला मुलगा असेल अशी कितीतरी पत्रे पेटीत पडायची. सध्या बदलत्या इंटरनेटच्या काळात जगभरात असणाऱ्या गावागावातील टपाल पेट्या अडगळीत पडू लागल्या असून, ब्रिटिशांच्या काळापासून जनतेशी असणारं त्यांचं नातं तुटू लागलं आहे. आता पेटीत पत्र पडत नाहीत.
पोस्टमनही पहिल्या सारखा दररोज टपाल वाटताना दिसत नसला तरी त्याला आता वेगवेगळी अनेक सरकारी कामे करावी लागतात हे मात्र दिसते.
या बदलत्या काळासोबत टपाल खात्याने बहुतांश कार्य प्रणाली मध्ये आवश्यक बदल केले आहेत. सर्वच स्तरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता पोस्ट देखील डिजिटल झाले आहे असे मत अमित देशमुखउ पविभागीय डाक निरीक्षक कर्जत उपविभाग यांनी व्यक्त केलं