प्रसिद्ध शिल्पकार पाचारणे यांची कलाकृती स्नेहालयात

नगर जिल्ह्याच्या सुपुत्राचा २६ ला पहिला स्मृतिदिन

अहिल्यानगर –
नगरचं नाव शिल्पकलेच्या क्षेत्रात ज्यांनी देशभर पोहोचवलं, ते शिल्पकार उत्तम पाचारणे बहुसंख्य नगरकरांना फारसे परिचित नव्हते. पुणे, मुंबई, दिल्ली अशा विविध शहरांत पाचारणे यांच्या कलाकृती पहायला मिळतात. २६ डिसेंबर हा पाचारणे यांचा पहिला स्मृतिदिन. हे औचित्य साधत त्यांची कलाकृती पाचारणे कुटुंबीयांनी स्नेहालयाला भेट दिली आहे.

उत्तम रोहिदास पाचारणे यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चखालेवाडीत १ जून १९५६ रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोंजता. उत्तम यांना चार भावंडे. उत्तम यांचे प्राथमिक शिक्षण चखालेवाडीत आणि माध्यमिक शिक्षण शिंदे गावी झालं. चित्रकला आणि शिल्पकलेचं प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडे घेतले. त्यांच्या वडिलांचं शिक्षण चौथीपर्यंत झालं होतं. रूढार्थाने त्यांनी कलेचं शिक्षण घेतलं नव्हतं. जन्मतःच त्यांना चित्र आणि शिल्पकलेची देणगी लाभली होती.
जत्रेत वाजविण्यात येणाऱ्या ढोलांच्या पानांवर चित्रं, तसंच लाकूड आणि पाषाणात शिल्फं घडविणाऱ्या वडिलांना मदत करत उत्तम यांनी या कलांचे धडे गिरवले. सणासुदीच्या काळात त्यांच्या गावी लेझीम खेळायची पद्धत होती. लेझीम खेळताना ढोल वाजवले जात. त्या ढोलांवर राम, मारुती, छत्रपती शिवाजी महाराज आदींची चित्रे असत. ही चित्रे रोहिदास काढत. कालांतराने ढोलांवरची देवादिकांची चित्रे कालबाह्य झाली आणि त्या जागी सिनेमातील नट-नट्यांची चित्रं झळकू लागली. ही चित्रं फटाक्यांच्या पाकिटांवर असत. रोहिदास ही चित्रेही काढत असत. याही कामात उत्तम त्यांना मदत करत. त्यामुळे लहान वयातच रंगरेषा, रचना, प्रमाण याबाबत उत्तम यांची नजर आणि हात तयार होत गेला.
वडिलांचा मुख्य व्यवसाय चामडे कमावण्याचा असल्यामुळे उत्तम यांना त्याही कलेचं शिक्षण मिळालं. रोहिदास हे शिल्पकृतीही घडवत. पाषाण आणि लाकडातून देवादिकांच्या मूर्ती घडवण्यात त्यांचा हातखंडा होता. महाराष्ट्रात १९७२ मध्ये दुष्काळ पडला, तेव्हा नाला बंडिंगसारखी दुष्काळी कामं सरकारने सुरू केली. त्या काळात रोहिदास ही हत्यारे तयार करण्याचं आणि धार लावण्याचं काम करत. उत्तम यांनी तेही काम शिकून घेतलं.

रोहिदास हे जरी खेड्यात राहत असले, तरी त्यांनी काळाची पावले ओळखली होती. शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी जाणलं होतं. त्यांनी आपल्या मुलाला, उत्तमला रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत दाखल केलं. ‘कमवा आणि शिका’ हे या शाळेचं बोधवाक्य. त्यामुळे वर्गात नकाशे काढणे, भारतीय संस्कृती, भारतीय लोकांची वेशभूषा अशा विषयांवरील चित्रं काढणं उत्तम यांना आवडे. शाळेतील लक्ष्मण ताटे या कलाशिक्षकांनी उत्तम यांच्यातील चित्रकलेचा गुण हेरत त्यांना उत्तेजन दिलं. उत्तम यांची चित्रकलेतील गती पाहून त्यांनी पुढे कला महाविद्यालयात जाऊन शिक्षण घ्यावं असं त्यांनी सुचवलं. त्यानुसार पाचारणे यांनी पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. तेथील वास्तव्यात त्यांच्यावर एस. टी. आहीर आणि दत्तात्रेय आपटे या शिक्षकांचा मोठा प्रभाव पडला. तिथे त्यांनी एटीडीचा अभ्यासक्रम पूर्ण करून मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. याच काळात बाबा आमटे यांच्या कार्याने पाचारणे यांचं तरुण मन भारावून गेलं. त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा म्हणून शिल्प तयार करावं, असं त्यांना वाटलं आणि त्या इच्छेतून साकारलं ‘होमेज टू आनंदवन’ हे अ‍ॅल्युमिनिअम माध्यमातील शिल्प. याच दरम्यान त्यांचा ज्योती पवनीकर यांच्याशी १९८५ मध्ये विवाह झाला. संसार मांडायला जागा हवी होती, ती समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या प्रयत्नाने मिळाली.

या दरम्यान उत्तम पाचारणे हे ज्येष्ठ चित्रकार गोपाळ अडिवरेकरांच्या संपर्कात आले आणि बॉम्बे आर्ट सोसायटी या संस्थेच्या कार्यात सहभागी झाले. समाजातील चांगल्या गोष्टींची दखल कलाकाराने घेऊन सामाजिक बांधीलकी जोपासली पाहिजे, या भावनेतून आणि अर्थार्जनासाठी अमूर्त शिल्पकलेकडून पाचारणे स्मारकशिल्पाकडे वळले. बोरिवली येथील स्वामी विवेकानंदांचा पुतळा, अंदमान येथील सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यज्योत आणि स्मारकशिल्प, मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रमात सहभागी झालेल्या वीरांचे शिल्प ही पाचारणे यांची काही उल्लेखनीय स्मारकशिल्पं आहेत. मराठवाड्यातील मुक्तिसंग्रमाच्या शिल्पात दहा फूट उंचीचे आठ खांब असून त्यावर स्वातंत्र्यलढ्यातील सहभागी ३२ वीरांची उठावशिल्पं आहेत. लखनौ आणि धुळे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झ धातूचा अश्‍वारूढ पुतळा, मंत्रालयासमोरील छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा औरंगाबाद येथील पुतळा, गोविंदभाई श्रॉफ, वीर अब्दुल हमीद मेमोरिअलमधील शिल्पे व गुरु-शिष्य स्मारक ही पाचारणे यांची काही अन्य स्मारकशिल्पे होत.

पाचारणे यांनी अनेक एकल व समूह प्रदर्शने केली असून विविध संस्थांच्या अखिल भारतीय प्रदर्शनांत भाग घेऊन पारितोषिके मिळवली आहेत. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील वार्षिक प्रदर्शनात १९७९ मध्ये ‘ऱ्हीदम’ या त्यांच्या शिल्पाला सुवर्णपदक मिळाले. स्कायलॅब कोसळण्याच्या भीतीने धास्तावलेल्या ‘बर्निंग ह्युमन’ या शिल्पाला १९८५ मध्ये नवी दिल्लीतील ललित कला अकादमीचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. ‘होमेज टू आनंदवन’ या शिल्पाला १९८६ या युवा वर्षानिमित्त ललित कला अकादमीकडून पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पाचारणे हे सतत नव्या प्रतिभेचा शोध घेत असत. त्यांनी नगरची नव्या पिढीतील चित्रकार प्रणीता बोरा हिला नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित कलावंतांच्या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी दिली. उत्तम पाचारणे यांचं निधन २६ डिसेंबर २०२३ रोजी झालं. त्याआधी त्यांनी
नगरच्या स्नेहालयाला भेट दिली होती. त्यांच्या निधनानंतर पत्नी ज्योती, ज्या कुशल सतारवादक आहेत, त्यांनी स्नेहालयाला भेट दिली. स्नेहालयाच्या “रेडिओ नगर ९०.४ एफएम”ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तम पाचारणे यांची आठवण म्हणून त्यांचं एक शिल्प स्नेहालयाला देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांनी मुंबईहून पाठवलेलं अनोखं शिल्प नगर-पुणे रस्त्यावरील स्नेहांकुरमध्ये विराजमान आहेत

शिल्पकार उत्तम पाचारणे यांनी महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्णाकृती स्मारक शिल्प साकारलं आहे. हा पुतळा आपली जन्मभूमी असलेल्या नगर जिल्ह्यात उभारला जावा, अशी त्यांची मनोमन इच्छा होती. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा उभारावा, अशी कलाप्रेमींची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *