सभापती प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत – जामखेडसाठी १०३४६ घरकुले मंजुर
कर्जत-जामखेड:
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा -२) २०२४-२५ साठी एकुण १० हजार ३४६ घरकुले मंजुर करण्यात आली आहेत. घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण शनिवारी करण्यात येणार आहे. घरकुले मंजुर झाल्यामुळे मतदारसंघातील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
‘सर्वांसाठी घरे’ प्रदान करणे या उद्देशाने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत जामखेड तालुक्यासाठी ४०८८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते, त्यापैकी ३९४९ घरकुले मंजुर झाली आहेत. तर कर्जत तालुक्यासाठी ६२५८ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते, त्यापैकी ६१२३ घरकुले मंजुर झाली आहेत.
सदर घरकुलांना मंजुरी मिळावी याकरिता विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता. प्रा शिंदे यांच्या पाठपुराव्यातून कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांसाठी १० हजार ३४६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. या लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची रक्कम शनिवार दि २२ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन पद्धतीने जमा होणार आहे.
महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (टप्पा -२) अंतर्गत २० लाख घरकुले मंजुर करण्यात आली आहेत. या सर्व लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देणे व त्यातील १० लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा कार्यक्रम उद्या शनिवारी २२ फेब्रुवारी रोजी पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे होणार आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सह आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांतील प्रत्येक ग्रामपंचायतीत लाभार्थ्यांना मंजुरी पत्र दिले जाणार आहेत.