*जागतिक किर्तीच्या शास्त्रज्ञांसमवेत विद्यार्थी व शिक्षणप्रेमींनी साधला परिसंवाद*
जामखेड: अथांग आणि अगाध अशा वैश्विक रचनेतील ‘मानवी जीवन’ ही ईश्वराची सर्वोत्तम निर्मिती असून आजच्या धकाधकीच्या युगात विज्ञान व अध्यात्म यांचा समन्वय असणे हेच आनंदी जीवनाचे रहस्य आहे असे प्रतिपादन पुणे येथील जागतिक किर्तीचे शास्त्रज्ञ डाॅ.भरत पाडेकर यांनी जामखेड येथे आयोजित परिसंवादात व्यक्त केले.
योगिराज प्रकाशन आळंदीद्वारा प्रकाशित, डाॅ.लता पाडेकर यांची प्रस्तावना तर ‘काजवा’कार पोपट श्रीराम काळे यांची पाठराखण लाभलेल्या परशुराम नागरगोजे यांच्या ‘पाचाट’ या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाच्या निमित्ताने आलेल्या पाडेकर दांपत्याने मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ या निवासस्थानी नुकतीच शनिवार दि.१३मे २०२३रोजी सदीच्छा भेट दिली.याचे औचित्य साधून परिसरातील अनेक विद्यार्थी,महिला,शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिक यांनी डाॅ.भरत पाडेकर यांना वैज्ञानिक प्रगतीवर तर डाॅ.लता भरत पाडेकर यांना आध्यात्मिक उन्नतीवर आधारित विविध प्रश्न विचारून परिसंवादात सक्रीय सहभाग घेतला व मुक्तचर्चा घडवून आणली. रात्री ९ते ११ या दरम्यान चाललेल्या पाडेकर दांपत्याच्या प्रकट मुलाखतीवजा परिसंवादात सर्वजण मंत्रमुग्ध झाले होते.
डाॅ.भरत पाडेकर यांनी बालपणी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी लढा देत ७ रू.मजुरीने काम करत स्वतःच्या बौद्धिक सामर्थ्यावर व अलौकीक जिद्दीच्या जोरावर पवई येथे आय.आय.टी. करून पुढे सातासमुद्रापार प्रवास करत इटली,जर्मनी,आॅस्ट्रेलिया इ. देशांत संशोधन तर पूर्व आफ्रिकेतील इथियोपिया देशात केलेले अध्यापन कार्य तसेच जागतिक किर्तीचा सन्मान मिळवून देखील जपलेला अत्यंत साधेपणा सर्वांनाच अंतर्मुख करून गेला.त्यांना डाॅ.जयंत नारळीकर,डाॅ.रघुनाथ माशेलकर,डाॅ.विजय भटकर अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या अनेक शास्त्रज्ञांचा सहवास व मार्गदर्शन लाभले आहे.परिसंवादात डाॅ.भरत पाडेकर यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीतील विविध प्रथा तसेच सण उत्सवातील अनेक परंपरा यांतील ऋषिमुनींचा वैज्ञानिक दृष्टीकोन विविध उदाहरणांच्या द्वारे सप्रमाण समजून सांगितला.भारतातील व विदेशातील अनेक शास्त्रज्ञांच्या जिद्दीच्या प्रेरणादायी कथा सांगितल्या .प्रज्ञा व प्रतिभेच्या जोरावर सर्व प्रयत्नवादी विद्यार्थ्यांना अवघे विश्व कवेत घेण्याची संधी विज्ञानाने आज उपलब्ध करून दिली आहे ,त्या संधीचे सोने करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
डाॅ.भरत पाडेकर यांच्या सुविद्य पत्नी डाॅ.लता पाडेकर यांनी संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठावर पी.एचडी.केली आहे.त्या कामी प्रबंधलेखनासाठी संशोधन करत असताना शेकडो वारकरी,नामधारक ,हरिपाठाचे परदेशी अभ्यासक यांच्या प्रत्यक्ष भेटीतील सुसंवादावर आधारित आध्यात्मिक अनुभवांची मुद्देसूद व सुसूत्र मांडणी करून मानवाच्या बाह्य प्रगतीसाठी विज्ञानाची तर मन:शांतिसाठी ध्यान,जप,नामसाधना इ.आध्यात्मिक उपायांची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.यावेळी डाॅ.लता पाडेकर लिखित ‘हरिपाठ:एक आनंदवाट’ आणि ‘साठवणीतील आठवणी’ या साहित्यकृतींवरदेखील सविस्तर चर्चा झाली.
या परिसंवादात गुलाब जांभळे,प्रशांत कुंभार,महादेव हजारे,किशोर अंदुरे,मारूती सराफ,राजेंद्र पवार,पांडुरंग मुरूमकर,गणेश साळुंके,केशव कोल्हे ,उमेश माळवदकर,संतोष घोलप इ.शिक्षणप्रेमी तसेच मोठ्या संख्येने महिला व विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.परिसंवादानंतर पाडेकर दांपत्याचा इनामदार परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.