*आमदार रोहित पवार यांनी घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट; हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के रक्कम मिळावी अशी विनंती*
*चारा छावण्या व पाण्याचे टँकर सुरू करण्याचीही आ. रोहित पवार यांची मंत्र्यांना विनंती*
कर्जत/ जामखेड | कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये यंदाच्या वर्षी सरासरी पावसापेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस नसल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके जळत आहेत याशिवाय पशुधनही पाणी व चाऱ्याअभावी ग्रस्त आहे. हे पशुधन जगविण्यासाठी चारा छावण्यांची अतिशय गरज आहे तसेच पशुधन आणि नागरिकांनाही पिण्यासाठी पाण्याची टंचाई जाणवत असल्याने पाण्याचे टँकरही चालू करण्याची गरज आहे. त्याचबरोबर प्रधानमंत्री कृषि विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याच अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आहे.
सध्याच्या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये राज्यातील १७ जिल्ह्यांतील २९७ महसूल मंडळांमध्ये पावसात २१ दिवसापेक्षा जास्त खंड पडलेला आहे. यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघाचाही समावेश असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. येथील शेतकऱ्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग, सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण घेतले असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थितीबाबत अधिसूचित महसूल मंडळांमध्ये ७ वर्षांच्या सरासरी उत्पन्नाच्या तुलनेत ५० टक्के घट अपेक्षित असावी व त्याअनुषंगाने राज्यशासन, विमा कंपनी आणि शेतकरी प्रतिनिधी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संयुक्त सर्वेक्षण करतील व त्याच्या अहवालानुसार येणाऱ्या नुकसान भरपाई रकमेच्या २५ टक्के आगाऊ रक्कम देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील कर्जत, मिरजगाव, माही, राशिन, भांबोरा व कोंभळी आणि जामखेड तालुक्यातील जामखेड, अरणगाव,खर्डा,नायगाव व नान्नज या महसूल मंडळांचा समावेश असून त्यांचे सर्वेक्षणही पूर्ण झाले असून अहवाल व प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करण्यात आलेले आहेत.
सदरील प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी मंत्री महोदयांना केली आहे. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चारा छावण्या व पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीही त्यांनी पत्राद्वारे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
*प्रतिक्रिया* (चौकट)
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मतदारसंघात विमा कसा घेता येईल यासाठी अधिकारी व आम्ही सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले. आणि आज नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर कर्जत-जामखेड मतदारसंघाचे नाव आहे. आता खऱ्या अर्थाने परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे ईथे शेतकऱ्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे त्वरित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत हंगामातील प्रतिकूल परिस्थिती(Mid Season Adversity) अंतर्गत नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के रक्कम मिळावी अशी विनंती मंत्री महोदयांना केली व चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर हे लवकरात लवकर चालू करावे अशी देखील विनंती केली आणि सरकारची मदत मिळेपर्यंत आम्ही खासगी टँकरने जसे आतापर्यंत पाणी देत आहोत तसेच यापुढेही टँकरने नागरिकांना पाणी पोचवत राहू, असे देखील त्यांना सांगितले.
– *आमदार रोहित पवार*