*आ.रोहित पवार यांनी घेतली कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट*
*कुकडीचे आवर्तन 5 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवण्याबाबत केली विनंती; घोड कालव्याच्या आवर्तनाबाबतही भेटीत चर्चा*
कर्जत/ जामखेड | कर्जत तालुक्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या कुकडी डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या 5 सप्टेंबरपर्यंत सुरू ठेवावे तसेच घोड डाव्या आणि उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू करावे, अशी विनंती कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून केली आहे. येत्या 2 तारखेला कालवा सल्लागार समितीची बैठक होणार आहे परंतु एवढा उशिर न करता त्याआधीच बैठक घेऊन त्यामध्ये मंत्री महोदयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशीही विनंती रोहित पवार यांनी केली आहे.
कर्जतमधील एकूण 54 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी कूकडी डाव्या कालव्यावर अवलंबून आहेत. मागील हंगामातील आवर्तन मे 2023 मध्ये संपून दोन महीने झाले आहेत, आणि पावसाळा सुरू होऊन देखील म्हणावा तसा चांगला पाऊस दोन्ही तालुक्यात झालेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी खालावली आहे. परिणामी खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी याचं अनुषंगाने आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून शेतकरी व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कुकडीच्या पाणी नियोजनाची बैठक घेतली होती ज्यामध्ये ३० तारखेऐवजी ५ सप्टेंबरपर्यंत आवर्तन सुरू ठेवण्याबाबत आमदार रोहित पवार यांनी विनंती केली आणि त्या विनंतीला अनुसरून अधिकाऱ्यांनीही शब्द दिला की आवर्तन ३० तारखेनंतरही सुरू राहील. आता आमदार रोहित पवार यांनी याच विषयी कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून याबाबत शेतकऱ्यांची बाजू मांडली.
यासोबतच घोड कालव्यावरती कर्जत जामखेड मधील एकूण 14 गावे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. मागील हंगामातील आवर्तन संपून जवळ जवळ दोन ते तीन महीने झाले आहेत. आणि यंदा पाऊसही कमी पडला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून टाळण्यासाठी आणि ओलीताखालील येणाऱ्या पीक क्षेत्रासाठी व पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर घोड कालव्याचे आवर्तन सुरू करावे, अशीही विनंती त्यांनी मंत्री महोदयांना केली आहे.
*प्रतिक्रिया* (चौकट)
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने, शेतीसाठी व पिण्यासाठी पाण्याची अडचण लक्षात घेऊन कुकडीचे आवर्तन 5 तारखेपर्यंत सुरू ठेवावे, अशी विनंती मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी भेटून केली. चंद्रकांतदादांनीही नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी याबाबत चर्चा केली. यासोबतच पाण्याचा दाब हा 500 च्या खाली ठेऊन चालणार नाही तो 500च्या वरती असावा जेणेकरून जास्त दाबाने पाणी मिळेल असे देखील यावेळी मी मंत्री महोदयांना सांगितले.
– *आमदार रोहित पवार*