जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा परिसरातील धक्कादायक घटना….
ग्रामपंचायत शिपायांचा घोडेगाव तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !!
खर्डा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद!
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेले बापू विश्वनाथ खवळे (वय ४१) हे वॉटर सप्लायची मोटार घोडेगाव येथे चालू करण्याकरिता गेले असता त्यांचा घोडेगाव तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयताचे मेव्हणे भाऊसाहेब पौडमल(वय ३१)यांनी खर्डा पोलिसांना सदर घटनेचे खबर दिली त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.दिलेल्या खबरीत ते म्हणाले माझे दाजी बापु विश्वनाथ खवळे हे ग्रामपंचाय कार्यालय पिंपळगाव आळवा येथे शिपाई म्हणुन काम करत होते.
दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८च्या सुमारास ग्रामपंचायतची पाणी पुरवठा करणारी इलेक्ट्रीक मोटार चालु करण्यासाठी ते घोडेगाव तलावावर गेले होते. परंतु दाजी बापु खवळे हे लवकर घरी परत न आल्यामुळे १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सागर हा वडील घरी आले नाही म्हणुन त्यांना पाहायला घोडेगाव तलावावर गेला होता.
त्यावेळी त्याला दाजी बापु खवळे यांचे कपडे पाण्याच्या कडेला दिसल्याने त्याने त्याच्या मित्रांना बोलावुन त्यांचा पाण्यामध्ये शोध घेतला असता दाजी हे ग्रामपंचायतची वॉटर सप्लाय करणारे विहीरीपाशी बेशुध्द अवस्थेत पडले होते. तेव्हा त्यांनी दाजी बापु खवळे यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपचाराकरिता घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन दाजी बापु विश्वनाथ खवळे पिंपळगाव आवळा ता. जामखेड हे औषध उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले, अशी खबर खर्डा पोलिस स्टेशनला देण्यात आली आहे. त्यानुसार खर्डा पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत