खर्डा ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे निर्देश
मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून तातडीने कारवाईचे आदेश
जामखेड | प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तालुक्यातील खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विभाजनाच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांना दूरध्वनीवरून खर्डा ग्रामपंचायतीचे विभाजन तातडीने करण्याचे निर्देश दिले.
या निर्णयामुळे खर्डा परिसरातील सहा गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होण्याची आशा निर्माण झाली असून ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.खर्डा ग्रुप ग्रामपंचायतीअंतर्गत नागोबाची वाडी, मुंगेवाडी, दरडवाडी, पांढरेवाडी, गीतेवाडी आणि गवळवाडी या गावांचा समावेश आहे. मोठे कार्यक्षेत्र आणि वाढती लोकसंख्या यामुळे मुख्य गावाव्यतिरिक्त इतर वाड्या-वस्त्यांच्या विकासावर परिणाम होत असल्याची तक्रार अनेक वर्षांपासून होती. विविध शासकीय योजना, विकासकामांचा निधी आणि मूलभूत सुविधांमध्ये या गावांवर अन्याय होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढत होती. या प्रश्नासंदर्भात संभाजीनगर उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. १२) नागोबाची वाडी, गवळवाडी, गीतेवाडी, पांढरेवाडी, मुंगेवाडी आणि दरडवाडी येथील ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली. ग्रामपंचायतीचे विभाजन करून प्रत्येक गावाला स्वतंत्र विकासाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. ग्रामस्थांनी आपल्या अडचणी व विकासातील अडथळे सभापतींसमोर मांडले.
ग्रामस्थांची मागणी ऐकताच प्रा. राम शिंदे यांनी तात्काळ ग्रामविकास विभागाच्या मुख्य सचिवांशी दूरध्वनीवर संपर्क साधला. खर्डा ग्रामपंचायतीच्या विभाजनाची प्रक्रिया कोणताही विलंब न करता पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. सभापतींच्या या तत्पर भूमिकेमुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रस्तावित विभाजनानुसार खर्डा हे स्वतंत्र ग्रामपंचायत म्हणून राहणार असून दरडवाडी, पांढरेवाडी, गीतेवाडी आणि गवळवाडी या गावांची एक स्वतंत्र ग्रामपंचायत, तर नागोबाची वाडी आणि मुंगेवाडी या गावांची दुसरी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येण्याची शक्यता आहे.
त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाचा स्वतंत्र निधी उपलब्ध होऊन रस्ते, पाणीपुरवठा, वीज तसेच इतर विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
अनेक वर्षांपासूनच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी सभापती प्रा. राम शिंदे यांचे आभार मानले. निर्णयाची माहिती मिळताच अनेक ठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या विभाजनाची प्रशासकीय प्रक्रिया आता लवकर पूर्ण होऊन विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
![]()
