जामखेडचे दुय्यम कारागृह कायमस्वरूपी बंद; ६२ आरोपींचे कडेकोट बंदोबस्तात नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थलांतर
राज्य शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी; ५९ पुरुष व ३ महिला आरोपींचे सुरक्षित स्थलांतर, यापुढे न्यायालयीन कोठडीतील कैद्यांचा मुक्काम नाशिकमध्येच
जामखेड प्रतिनिधी
राज्य शासनाच्या आदेशानुसार जामखेड तालुक्यातील न्यायालयीन कोठडीसाठी वापरण्यात येणारे दुय्यम कारागृह अखेर कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करत बुधवारी (दि. ९ जुलै) येथील ६२ आरोपींना कडेकोट पोलीस बंदोबस्तात नाशिक येथील मध्यवर्ती कारागृहात स्थलांतरित करण्यात आले. यापुढे जामखेड न्यायालयीन कोठडीतील सर्व आरोपींचा मुक्काम नाशिक मध्यवर्ती कारागृहातच असणार आहे.

राज्य शासनाने सुरक्षेच्या दृष्टीने तसेच जीर्ण अवस्थेतील कारागृहांचा विचार करून राज्यातील ११६ दुय्यम कारागृहे कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक कारागृहांच्या इमारती जीर्ण झाल्या असून, काही ठिकाणी कैदी पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कैद्यांना जवळच्या जिल्हा किंवा मध्यवर्ती कारागृहात टप्प्याटप्प्याने हलविण्याची प्रक्रिया सुरू आहे.या निर्णयानुसार जामखेड येथील दुय्यम कारागृहातील ५९ पुरुष व ३ महिला अशा एकूण ६२ आरोपींना दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या वाहन ताफ्यातून नाशिककडे रवाना करण्यात आले.
स्थलांतराच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कारागृह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण प्रक्रिया शांततेत, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडली. आरोपींना निरोप देण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी कारागृहाबाहेर गर्दी केली होती. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे भावनिक चित्रही पाहायला मिळाले.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान सर्व प्रशासकीय व सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. जामखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी तसेच खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट –
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी व खर्डा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत यांनी संपूर्ण स्थलांतर प्रक्रिया कडेकोट पोलीस बंदोबस्तात आणि शांततेत पार पडली.यापुढे जामखेड न्यायालयीन कोठडीतील सर्व आरोपींचा मुक्काम नाशिक मध्यवर्ती कारागृहात होणार
![]()



