पाण्याचा वापर जपून करा, गरजेपुरतेच पाणी वापरा – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचे आवाहन…
दहिगाव-जामखेड पाणीपुरवठा योजना दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पाणीटंचाईच्या पत्रकार परिषदेला मुख्याधिकाऱ्यांची दांडी
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड शहरासह उपनगरातील सात गावांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जामखेड नगरपरिषदेच्या वतीने विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची व्यवस्था करण्याच्या मागणीवर बुधवार, दि. २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत ठराव घेण्यात येणार आहे. तसेच भुतवडा तलावातून चारीद्वारे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू झाली असून, दहिगाव (उजनी) ते जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जामखेड शहरातील आरोळेवस्ती, कोल्हे वस्ती, खंडोबा वस्ती, सदाफुले वस्ती, तपनेश्वर परिसर, मिलिंद नगर, मोरे वस्ती, अहिल्या वस्ती आणि बोराटे वस्ती यांसह जांबवाडी, भुतवडा, लेहनेवाडी, धोत्री, बटेवाडी, जमादारवाडी व चुंबळी या गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरपरिषदेने तातडीच्या उपाययोजनांवर भर दिला आहे.
भुतवडा तलावातून पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू भुतवडा तलावात पाच पाणबुडी मोटारी बसवून चारीद्वारे पाणी सोडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. याशिवाय उपनगरातील वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे खोलीकरण, आडवे बोअर घेणे आणि विहिरींमधील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या विहिरी व बोअरवेलमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे, त्यांचे आवश्यकतेनुसार अधिग्रहण करून पाणीपुरवठ्यासाठी उपयोग केला जाणार आहे.
दहिगाव-जामखेड योजना दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जामखेड शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी दहिगाव (उजनी) ते जामखेड पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेतील जलशुद्धीकरण केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आली असून, मनोज कुलकर्णी यांनी ही जागा नगरपरिषदेला विना मोबदला बक्षीसपत्राद्वारे दिली आहे. वनविभागाच्या परवानगीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाशी पत्रव्यवहार सुरू आहे.पाणीपुरवठा वाहिनी शेतजमिनीतून जाणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधून अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणीपुरवठा विभागाचे सभापती श्रीराम डोके या योजनेचा सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मुख्याधिकारी, नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांच्या समन्वयातून ही योजना पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
यासाठी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत असल्याचेही नगराध्यक्षांनी सांगितले.पाणीप्रश्नावर राजकारण नको! पाणीटंचाईच्या प्रश्नावर नागरिक आणि आंदोलकांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. या गंभीर प्रश्नात राजकारण न आणता एकमेकांना सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी केले. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, पाणीपुरवठा सभापती श्रीराम डोके, नगरसेवक मोहन पवार, प्रविण होळकर, नगरसेवक विकी घायतडक सर ,माजी नगरसेवक अमित चिंतामणी, नगरसेवक प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी आदी उपस्थित होते.
चौकट –
जामखेडच्या पाणीप्रश्नावर गांभीर्य किती?आयोजित पत्रकार परिषदेला मुख्याधिकारी गैरहजर….
दरम्यान, शहर आणि उपनगरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईसारख्या गंभीर विषयावर आयोजित पत्रकार परिषदेला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांची उपस्थित नसल्याचे दिसून आले.
![]()
