जामखेड – करमाळा मार्गावरील बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करव्यात.
— सभापती प्रा राम शिंदे
जामखेड –
जामखेड – करमाळा मार्गावर बंद केलेल्या बसगाड्या पुर्ववत सूरू करण्याबरोबरच नियमीत वेळेवर बस सोडण्याच्या सुचना महाराष्ट्र विधानपरिषदचे सभापती प्रा राम शिंदे यांनी जामखेड आगारप्रमुखांना केल्या आहेत.
जामखेड – करमाळा मार्गावरील अचानक बंद करण्यात आलेल्या बस पुर्ववत सूरू कराव्यात आणि नियमीत वेळेवर बस सोडण्याची मागणी सभापती राम शिंदे यांच्याकडे जवळा येथील भाजपा नेते प्रशांत पाटील , राहूल पाटील, उमेश रोडे, राष्टपाल आव्हाड, संतोष सुरवसे, महादेव वाळुंजकर, एकनाथ हजारे,महेंद्र खेत्रे, सुभाष धोत्रे यांनी निवेदनाव्दारे केली होती. याची दखल घेत सभापती शिंदे यांनी जामखेड आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना दुरध्वनीवर संपर्क करून तशा सुचना दिल्या.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जामखेडच्या आगारप्रमुखांच्या मनमानी कारभाराचा फटका प्रवाशांना बसत असून, याबाबत विचारणा केल्यास उध्दटपणाची वागणूक प्रवाशांना मिळत आहे. जवळा मार्गावरील अनेक वर्षापासून चालु असलेल्या गाड्या आगारप्रमुखांनी अचानक बंद केल्याने प्रवाशांना मोठया गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. कोणतीही गाडी वेळेवर सूटत नसल्याने विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नूकसान होत आहे.
जामखेड आगाराची ५० वर्षांपासून नियमीत चालु असलेली जामखेड – जवळा मुक्कामी बस पुर्ववत सूरू करणे गरजेचे आहे. सदरची बस अचानक बंद करण्यात आल्याने रात्री जवळा , नान्नज, बोर्ले,राजेवाडी,धोंडपारगाव, झिक्री, पाडळी, सरदवाडी, चुंबळी या गावांमधील प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत जाणे शक्य होत नाही. जामखेडहून रात्री साडेआठ वाजता निघणा-या या बसमुळे नगर,पुणे,बीड तसेच बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांना उशीरात उशीरा गावाकडे जाणे शक्य होत होते. मात्र सदरची गाडी जामखेड आगारप्रमुखांनी काहीही कारण नसताना अचानक बंद केली आहे. गाडी बंद असल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत.
जामखेड आगाराची गेली ४० वर्षापासून चालु असलेली जवळा – नगर (जवळा मुक्कामी ) बस जामखेड आगारप्रमुखांनी अचानक बंद केल्याने जवळा, हाळगाव, पिंपरखेड व अरणगाव परिसरातील प्रवाशांना अहिल्यानगरला जाण्यायेण्यासाठी खूपच गैरसोय झाली आहे. नगर जवळा मुक्कामी बस पुर्ववत सूरू करणे गरजेचे आहे.
जामखेड-करमाळा रस्त्यावर अनियमीत वेळेत बस चालत असल्याने प्रवाशांचे खूपच हाल होत आहेत. या मार्गावर २-२ तास बस फेरी होत नसल्याने,प्रवाशी तसेच विशेषकरून विद्यार्थ्यांचे खूपच हाल होत आहेत. काॅलेज सूटल्यानंतर गावी येण्यासाठी वेळेवर बस नसल्याने या विद्यार्थ्यांना जामखेड बसस्थानकावरच २-२ तास बसची वाट पाहत बसावे लागते. यामध्ये वेळेचा अपव्यय होतानाच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नूकसान होत आहे. याप्रश्री करमाळा रस्त्यावर नियमीत व वेळेवर बस सुटण्याबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.
अकलुज (जिल्हा सोलापुर) आगाराची अकलूज – संभाजीनगर ही एकमेव बस जवळा गावात न येता जवळा गावाबाहेरून जात असल्याने, अकलूज तसेच संभाजीनगरकडे जाणा-या प्रवाशांना ही बस असून अडचण,नसून खोळंबा अशी परिस्थिती झाली आहे. या बसला जवळा थांबा असल्याने या बसमध्ये प्रवाशी घेतले जातात. मात्र प्रवाशांना जवळा बसस्थानकावर न सोडता जामखेड करमाळा मार्गावरच उतरवले जाते. यात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याप्रश्री मागणी केल्यानंतर तात्पुरती काही दिवस बस जवळा बसस्थानकावर येते.मात्र या बसचे चालक वाहक मनमानीपध्दतीने पुन्हा बस बाहेरूनच घेवून जातात. याबाबत अकलूज आगाराने सबंधीत चालक वाहकांना सुचना देण्याची मागणी केली आहे.
याबाबतचे निवेदन राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अहिल्यानगरचे विभाग नियंत्रक, जामखेडचे आगारप्रमुख व अकलुजचे आगारप्रमुख यांना देण्यात आले आहे.
फोटो –
जामखेड – एसटी बाबत आगारप्रमुख प्रमोद जगताप यांना निवेदन देताना भाजपा नेते प्रशांत पाटील , राहूल पाटील, उमेश रोडे, संतोष सुरवसे, महादेव वाळुंजकर, राष्टपाल आव्हाड, एकनाथ हजारे,महेंद्र खेत्रे, सुभाष धोत्रे