आनंद मेळाव्याच्या शांतता समिती बैठकीतच वादाची ठिणगी

आनंद मेळाव्याच्या शांतता समिती बैठकीतच वादाची ठिणगी

आनंद मेळाव्याच्या आयोजनावरून मतभेद; पार्किंग, मोकाट जनावरे, रस्त्यांवरील खड्डे व सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

जामखेड प्रतिनिधी –

नागपंचमी उत्सवानिमित्त जामखेड शहरात होणाऱ्या आनंद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत विविध मुद्द्यांवरून जोरदार चर्चा झाली. आनंद मेळाव्याचे ठिकाण, पार्किंग व्यवस्था, तिकीट दर, सुरक्षाव्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, मोकाट जनावरे तसेच रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर पदाधिकारी, नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.या बैठकीस नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सभापती शरद कार्ले,उपसभापती नंदु गोरे,नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, अमितभाऊ चिंतामणी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, नगरसेवक प्रशांत राळेभात नगरसेवक विकी घायतडक, नगरसेवक वसीम सय्यद, सामाजिक कार्यकर्ते राम पवार, नगरसेवक हर्षद काळे, नगरसेवक मनोज कुलकर्णी,सामाजिक कार्यकर्ते प्रदीपभाऊ टापरे, नगरसेवक संजय काका काशीद, नगरसेवक मोहन पवार, प्रविण होळकर, नगरसेवक श्रीराम डोके, कुंडल राळेभात, संपत नाना राळेभात, नगरसेवक जावीद कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार, राहुल उगले, पवन राळेभात, डिगा चव्हाण संतोष नवलाखा आदी पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

पार्किंग व सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर प्रदीप टापरे यांनी आनंद मेळाव्याच्या काळात शहरातील मोकाट जनावरे, रस्त्यांवरील खड्डे तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. उत्सवाच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.राहुल उगले यांनी आनंद मेळाव्याच्या ठिकाणी पार्किंगच्या प्रश्नामुळे वाद निर्माण होतात, असे सांगत नगरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती जामखेडमध्ये होऊ नये, यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, अशी मागणी केली.अजयदादा काशीद यांनी दरवर्षीप्रमाणे आनंद मेळाव्यात कुस्त्यांचे आयोजन केले जाते. त्यामुळे नागरिक व वाहनांची मोठी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने स्वतंत्र पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.

‘नगरपरिषद हुकूमशाही चालवते का?’बैठकीत नगरसेवक प्रशांत काका राळेभात यांनी नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केला. शांतता समितीच्या बैठकीत सर्व नागरिकांना आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.सामाजिक कार्यकर्ते डिगा चव्हाण यांनी आनंद मेळावा भरवायचा असल्यास शहरातील तीन ठिकाणी मेळावा भरवण्याचा पर्याय प्रशासनाने विचारात घ्यावा, असे सुचविले. तसेच तिकीट दराबाबतही त्यांनी भूमिका मांडत, एका ठिकाणी ५० रुपये तर दुसरीकडे ३० रुपये दर राहिल्यास नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो, असे सांगितले.नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांनी बैठकीतील चर्चेला उत्तर देताना मागील वर्षी आनंद मेळाव्याचे तिकीट दर १०० रुपये होते; मात्र यावेळी ते दर कायम ठेवले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नागरिकांना कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, याचा विचार करून त्या देण्याचा प्रयत्न नगरपरिषदेकडून केला जाईल. शांतता समितीच्या बैठकीत आपापसांत भांडण न करता एकत्र बसून चर्चा करून निर्णय घेणे गरजेचे आहे. नागपंचमी हा जामखेडचा उत्सव असून तो शांततेत व उत्साहात पार पडला पाहिजे, असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी चिंतामणी यांनी सांगितले.संपत नाना राळेभात यांनी मागील वर्षी तीन दिवस आनंद मेळावा नागरिकांसाठी मोफत ठेवण्यात आला होता, याची आठवण करून देत यंदाही नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याची मागणी केली.पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त
पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी सांगितले की, आनंद मेळावा नेमका कुठे भरवायचा, याबाबत तहसीलदार व नगरपरिषद प्रशासन निर्णय घेणार आहे.

जामखेड पोलीस ठाण्याच्या वतीने आनंद मेळाव्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मेळाव्याचे वेळापत्रक रात्री दहा वाजेपर्यंत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, शांतता समितीच्या बैठकीतच आनंद मेळाव्याच्या नियोजनावरून विविध मतप्रवाह समोर आल्याने प्रशासनासमोर आता उत्सव शांततेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्याचे आव्हान उभे राहिले आहे. मुख्याधिकारी बैठकीस गैरहजर राहिल्याने नगरपरिषद प्रशासनाची भूमिका काय राहणार, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles