हाळगाव कृषी महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्याला मारहाण; रॅगिंगप्रकरणी चौघांसह अनोळखी विद्यार्थ्यांवर गुन्हा

हाळगाव कृषी महाविद्यालयातील वसतिगृहात विद्यार्थ्याला मारहाण; रॅगिंगप्रकरणी चौघांसह अनोळखी विद्यार्थ्यांवर गुन्हा

जामखेड प्रतिनिधी –

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हाळगाव (ता. जामखेड) येथील वसतिगृहात विद्यार्थ्याला रॅगिंग करून मारहाण केल्याप्रकरणी चौघांसह काही अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी वेदांत दगडू तळुले (वय १८, रा. निमगाव घाना, पोस्ट भाळवणी, ता. जि. अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋतीक दत्तात्रय शेळके, पियुष कुंभार, सुशील हेमंत मालकाने, प्रतिक कुमार वाघमोडे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) तसेच काही अनोळखी विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीनुसार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास तसेच दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री १२.१५ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपल्या खोलीत झोपलेला असताना आरोपींनी खोलीच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला.

त्यानंतर काही आरोपींनी लाकडी काठीने हात, पाठ व पोटावर मारहाण केली, तर काहींनी लाथाबुक्क्यांनी डोक्यात व बरगड्यांवर मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.फिर्यादीने आरडाओरड करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपींनी रेक्टर कुलकर्णी यांना फोन करून आमची तक्रार का केली, असा जाब विचारत शिवीगाळ केली. तसेच, कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचे असेल तर आम्ही सांगू तसे वागावे व राहावे लागेल, अशी दमदाटी केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ६३०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा १९९९ मधील कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी करीत असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल टी. बी. सोनवणे यांनी गुन्हा दाखल केला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, पोहेकॉ टी. बी. सोनवणे व पोहेकॉ एस. डी. लोखंडे यांनी भेट दिली.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles