*जामखेड शहर व तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती; पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

*जामखेड शहर व तालुक्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती; पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी*

जामखेड :

जामखेड शहर व तालुक्यात सध्या दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रमुख तलाव, बंधारे व पाण्याचे स्रोत झपाट्याने कोरडे पडत आहेत. त्यामुळे आगामी काळात पिण्याच्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून प्रशासनाने आतापासूनच ठोस नियोजन करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली.

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील पाणीसाठा येत्या काही दिवसांत संपण्याची शक्यता असल्याने शहराच्या पर्यायी पाणीपुरवठ्याचे तातडीने नियोजन करावे, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्यांमध्येही पाणीटंचाई निर्माण होण्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.

याबाबत गुरुवार, दि. २७ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले. निवासी नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले.

प्रशासनाने जामखेड शहर व तालुक्यासाठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला आहे काय, याची माहिती जनतेसमोर जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली. आराखडा सार्वजनिक केल्यास त्यामध्ये आवश्यक सुधारणा किंवा अतिरिक्त उपाययोजनांबाबत नागरिक व लोकप्रतिनिधींना सूचना करता येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.

शहरासाठी पर्यायी पाणीपुरवठ्याबरोबरच ग्रामीण भागासाठी गावनिहाय टंचाई आराखडा तयार करून आवश्यक ठिकाणी टँकर, विहीर अधिग्रहण, नवीन विंधन विहिरी, पाईपलाईन आदींचे प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवावेत, अशी मागणी करण्यात आली.

पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता लक्षात घेऊन पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक यंत्रणा व मनुष्यबळाची पूर्वतयारी आतापासूनच करावी, तसेच पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता लक्षात घेऊन चारा डेपो किंवा चारा छावणी सुरू करण्यासाठी आवश्यक आराखडा तयार करावा, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर यांनी प्रशासनाने टंचाई निर्माण झाल्यानंतर धावपळ करण्याऐवजी आतापासूनच नियोजन करण्याची गरज व्यक्त केली. मागील टंचाईच्या काळात आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून प्रशासनाची वाट न पाहता वाड्या-वस्त्यांवर पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले जात होते. मात्र एका वर्षी हे टँकर अडवण्यात आले. शासकीय टँकर देताना नियम-अटी पुढे केल्या जातात आणि लोकप्रतिनिधी स्वतःच्या माध्यमातून जनतेसाठी पाणी उपलब्ध करून देत असेल तर त्यालाही आडकाठी आणली जाते, अशी टीका त्यांनी केली.

“यावर्षी पाणीटंचाई निवारणाची जबाबदारी शासन आणि प्रशासनानेच पार पाडावी. आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे आवश्यक ती मदत योग्य वेळी मागू; मात्र शासनाची जबाबदारी शासनानेच पार पाडली पाहिजे,” अशी भूमिका गोलेकर यांनी व्यक्त केली.

प्रशासनाने मागण्यांची गांभीर्याने दखल न घेतल्यास येत्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

यावेळी तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, मंगेश आजबे, शरद शिंदे, सुरेश भोसले, सुनील कोठारी, नगरसेवक वसीम सय्यद, माजीद कुरेशी, प्रशांत राळेभात, रामहरी गोपाळघरे, बापुसाहेब कार्ले, अभय शिंगवी, सुनील उगले, बाळासाहेब खैरे, अनिल रेडे, कुंडल राळेभात, सुदाम गव्हाणे, महादेव डिसले, शिवाजी डोंगरे, बाबासाहेब मगर, बजरंग डुचे, अनिल बाबर, सचिन शिंदे, पोपट कार्ले, हरीभाऊ आजबे, रामभाऊ बाबर, वसीम शेख, दत्ता डिसले, उगले सर आदी उपस्थित होते.

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles