जामखेड येथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी,
साहीत्याची आवड आईच्या अंगाई पासुनच लागत असते, साहीत्य म्हणजे जे समाज हीताचे आहे त्याला साहीत्य म्हणतात. साहीत्य हे समाज्याला घेऊन चालते. तसेच लेखक व विचारवंत हे समाज्याला दिशा देण्याचे काम करत असतात असे मत ग्रामिण साहीत्यीक व संमेलनाचे अध्यक्ष विजयकुमार मिठे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व मराठी साहित्य प्रतिष्ठान, जामखेडच्या वतीने राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन कवीवर्य आ.य.पवार यांच्या संकल्पनेतून व जेष्ठ ग्रामीण साहित्यिक, कवी विजयकुमार मिठे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दि.६ फेब्रुवारी रोजी जामखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी ते बोलत होते.
संमेलनाचे उद्घाटक विधान परिषदेचे प्रा.राम राम शिंदे यांनी बोलताना सांगितले की साहित्यिकांनी समाजाला नवा विचार देण्यासोबत ऊर्जा देण्याचे कार्य केले, शोषित-वंचित-पीडितांच्या समस्यांना प्रभावी पणे समाजासमोर मांडले. आज देखील शेतकरी-कष्टकऱ्यांच्या व्यथा मांडताना साहित्यिकांनी समाज प्रबोधनावर भर द्यावा, साहित्य आणि समाज यांचे नाते अतूट आहे. ग्रामीण जीवनाचे वास्तव मांडणाऱ्या साहित्य निर्मितीमुळे समकालीन सामाजिक प्रश्न, लोकजीवन, लोकसंस्कृती, निसर्गसौंदर्य, शेतीचे प्रश्न समाजा समोर येतात. साहित्यातून समाज जीवन प्रतिबिंबित होते आणि मानवी जीवनाला दिशा मिळते. साहित्य नसेल तर जीवन नीरस होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध चित्रपट गीतकार बाबासाहेब सौदागर म्हणाले की स्वर्गीय प्रा.आ.य पवार यांनी साहित्याची पालखी आमच्या खांद्यावर दिली आहे. ती आम्ही जबाबदारीने पेलणार आहोत. हार घालणारे कमी पण प्रहार करणारे जास्त भेटतात कारण यशाचा हार आपल्या गळ्यात पाडायचा आसेल तर अपयशाचे हजारो प्रहार आपल्याला झेलावे लागतात. पुरस्कार देणारे कमी तर तिरस्कार करणारे जास्त भेटतात मात्र प्रा.आ.य.पवार साहित्य नगरी मध्ये मला पुरस्कार देण्यात आला. तुम्ही मला दिलेली मायेची शाल मी पाठीवर पांघरली आहे ती कधी खाली पडु देणार नाही.
साहित्यातुन संस्कृतीचे दर्शन होते.साहित्यातून इतिहास काय आहे तो समजतो.सुज्ञ समाजाला समजण्यासाठी साहित्याची गरज आहे.साहित्याशिवाय समाजाची जडणघडण होऊ शकत नाही. लोकांमध्ये साहित्याचे प्रेम वाढावे आणि ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी हे मराठी साहित्य प्रतिष्ठान धडपडत असते. त्यामुळेच या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे असे मत संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रा. मधुकर आबा राळेभात यांनी व्यक्त केले.
यावेळी दिवसभरात झालेल्या कार्यक्रमांमध्ये सकाळी ग्रंथदिंडी, “मराठी भाषा व आजची सद्यस्थिती” या विषयावरील परिसंवाद कार्यक्रम झाला. दुपारी बाबासाहेब सौदागर यांची प्रकट मुलाखत जेष्ठ पत्रकार गुलाब जांभळे यांनी घेतली. सायंकाळी शालेय विद्यार्थीनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यानंतर ग्रंथ पुरस्कार वितरण सोहळ्यात छत्रपती राजे संभाजी साहित्य पुरस्कार विधान परिषद सदस्य सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते व प्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर यांच्या शुभहस्ते देण्यात आले. तर रात्री महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कवी संमेलन संपन्न झाले.
यावेळी मराठी साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ.राजेश गायकवाड, डॉ.किसन माने, साहित्य प्रतिष्ठानचे अवधूत पवार, विनायक राऊत, डॉ.जतीनबोस काजळे, डॉ. विद्या काशिद, शत्रुघ्न कदम सर, पवनराजे राळेभात, दिगांबर चव्हाण, अमित जाधव, मोहन डुचे सर, डॉ. संजय राऊत, गोकुळ गायकवाड, अनिल आष्टेकर सर, गुलाब जांभळे, रंगनाथ राळेभात, प्रदिप राळेभात, एकनाथ चव्हाण, मनोहर इनामदार, मारुती काळदाते, हनुमंत निकम सह आदी मान्यवर उपस्थित होते.