*जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून संपन्न होत असलेला राज्यातील एक अभिनव शैक्षणिक उपक्रम*.

*’बांधखडक शिक्षणोत्सव’ राज्याला दिशादर्शक ठरेल-प्रसिद्ध साहित्यिक प्रा.भास्कर बडे*

*दिग्गज कथाकारांसह विद्यार्थ्यांच्या दर्जेदार कथाकथनाने जिंकली रसिकांची मने*
———————————————
जामखेड: तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून जि.प‌.प्रा.शाळा बांधखडक येथे दि.२१ते २५ नोव्हेंबर २०२३ या काळात संपन्न होत असलेल्या बांधखडक,वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या तीन शाळांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या शिक्षणोत्सव कार्यक्रमाचे द्वितीय पुष्प बुधवार दि.२२नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ८:०० वाजता प्रसिद्ध ग्रामीण कथाकार प्रा.भास्कर बडे यांच्या अध्यक्षतेखाली व हिंगोली येथील प्रसिद्ध कथाकार शिवदास पोटे व ‘पाचाट’कार परशुराम नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत कथाकथनाने संपन्न झाले.
प्रारंभी शिवतेज मुकुंद ढाळे ,पार्थ तानाजी काळे ,अक्षरा अमोल वारे व नागेश आप्पासाहेब वारे या विद्यार्थ्यांनी आपापल्या स्वरचित कथा सादर केल्या.शिवदास पोटे यांच्या ‘परिवर्तन’ या शिक्षणाचे महत्त्व समजावणा-या कथेने नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच विविध स्पर्धा परिक्षांचे महत्त्व आजच्या स्पर्धेच्या युगात किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखीत केले. परशुराम नागरगोजे यांच्या ‘आयुष्याची संध्याकाळ’ या वयोवृद्धांच्या सद्यकालीन गंभीर समस्यांची प्रभावीपणे मांडणी केलेल्या कथेने सर्वांनाच अंतर्मुख करून प्रभावीत केले.
प्रा.भास्कर बडे सरांनी अखिल भारतीय साहित्य संमेलन घुमान (पंजाब) तसेच विविध राज्य व राष्ट्रीय पातळीवर सादर केलेल्या ‘खिला-या’ या एका बैलाच्या जीवनावर आधारित अस्सल ग्रामीण मराठवाडी बोलीचे दिग्दर्शन करणा-या संवेदनशील कथेने सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
तत्पूर्वी सकाळी ९:३०ते सायं.५:०० यावेळेत कराटे प्रशिक्षक मा.श्री.श्याम पंडित, हस्ताक्षरतज्ज्ञ मा.श्री.संतोष घोलप,नृत्यप्रशिक्षक मा.श्री.सोहेल आतार,अनुष्का अंधारे व शिवानी वाघे तसेच सेवानिवृत्त मुख्या.तथा कार्यानुभव तज्ज्ञ मा.श्री.मोहन खवळे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.
कथाकथनाचे प्रास्ताविक बांधखडक शाळेचे मुख्या.मा.श्री.विकास सौने यांनी तर आभार प्रदर्शन मा.श्री.मनोहर इनामदार यांनी केले.ईशस्तवन माता पालक सदस्या मा.सौ.अर्चना विजय वारे यांनी तर स्वागतगीत व सूत्रसंचालन बांधखडक शाळेच्या माजी विद्यार्थीनी कु.मयुरी वारे व कु.ज्ञानेश्वरी वारे यांनी केले.
या शिक्षणोत्सवात दि.२१ते २४नोव्हेंबर या काळात रोज सकाळी ९:३०ते सायं.५:०० या वेळेत योगासने,कराटे,लेझिम,कागदकाम ,सुंदर हस्ताक्षर,नृत्य ,अभिनय ,चित्रकला,मनोरंजक विज्ञानखेळ इ.विषयांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना तज्ज्ञांमार्फत दिले जाणार असून शुक्रवार दि.२४ रोजी सकाळी बाल आनंद मेळावा अर्थात विद्यार्थ्यांच्या खाद्य पदार्थांचे स्टाॅल्स मांडून विक्री (आनंदनगरी) केली जाईल तसेच भव्य रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.
रोज रात्री ८:०० ते १०:०० यावेळेत सर्वांसाठी प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.यात गुरूवार दि.२३रोजी बीड जिल्ह्यातील आदर्श शाळा जरेवाडीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक मा.श्री. संदीप पवार यांचे अध्यक्षतेखाली वरवंडी तांडा ता.पैठण
या शाळेतील उपक्रमशील शिक्षक तथा प्रसिद्ध व्याख्याते मा.श्री. भरत काळे यांचे व्याख्यान होईल व शुक्रवार दि.२४ रोजी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम (गॅदरिंग) संपन्न होईल.

चौकट
शनिवार दि.२५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०:०० वा. ज्यांच्या प्रेरणेने या ऐतिहासिक व प्रेरणादायी शिक्षणोत्सवाचे आयोजन केलेले आहे असे जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील सर्व शिक्षणविस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख व शिक्षक बांधव यांच्या उपस्थितीत समारोप कार्यक्रम होणार असून शिक्षणोत्सवात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करून गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे.

या शिक्षणोत्सवात नायगावचे केंद्रप्रमुख संतोष वांडरे व खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री.सुनील जाधव यांचे मार्गदर्शन लाभणार असून या सर्व प्रेरणादायी उपक्रमांस पालक, ग्रामस्थ व तालुक्यातील साहित्य व शिक्षणप्रेमी कलारसिकांनी उपस्थित राहून सहकार्य करण्याचे आवाहन विकास सौने, मनोहर इनामदार ,नितीन जाधव,प्रविण शिंदे ,बाबा चव्हाण व प्रमोद कचरे या तीनही शाळांतील शिक्षकवृंदांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *