कर्जतमध्ये प्रथमच ‘महाराष्ट्र केसरी’!, कुस्ती व भक्तीचा अभूत संगम

कर्जतमध्ये प्रथमच ‘महाराष्ट्र केसरी’!, कुस्ती व भक्तीचा अभूत संगम
आमदार रोहित पवार व कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत मैदानाचे पूजन

जामखेड प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने कर्जत-जामखेड मतदारसंघात २६ ते ३० मार्च दरम्यान प्रथमच ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे भव्य अधिवेशन आयोजित करण्यात आले असून आमदार रोहित पवार आणि कुस्ती क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते कर्जतमधील दादा पाटील महाविद्यालयाशेजारील मैदानावर या ऐतिहासिक स्पर्धेसाठीच्या मैदानाचे पूजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.

या भव्य कुस्ती अधिवेशनाची जोरदार तयारी सध्या सुरू असून आमदार रोहित पवार मित्र परिवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या वतीने कुस्ती स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र केसरी’च्या इतिहासात अभूतपूर्व असा हा कुस्ती महोत्सव ठरावा, यासाठी राजकारण विसरून सर्वजण आपापल्या परीने सहयोग देत आहोत. राज्यभरातील सुमारे ९०० हून अधिक मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असून, कोणत्याही मल्लावर अन्याय होणार नाही, याची काळजी आयोजकांच्या वतीने देण्यात येणार आहे.


विशेष म्हणजे, या कुस्ती महोत्सवाच्या दरम्यान जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांच्या पादुका कर्जत-जामखेड मतदारसंघातील सिद्धटेक या तीर्थक्षेत्री येणार आहेत, त्यामुळे कर्जत-जामखेडमध्ये एकाच वेळी भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम घडणार आहे.

‘महाराष्ट्र केसरी’ ची गदा पटकावलेले सर्व विजेतेही या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला हजेरी लावणार आहेत. तसेच, तब्बल ४० वर्षापासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आणि कुस्ती क्षेत्राला नवी दिशा देणारे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार यांचीही स्पर्धेच्या समारोपाला उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेच्या नियोजनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम सुविधा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंचांची नेमणूक, तसेच गुणवत्तेनुसार विजेता ठरावा यासाठी कोणताही राजकीय हस्तक्षेप न होण्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच या कुस्ती स्पर्धेमध्ये निर्णय घेताना तुसभरही चुक होऊ नये यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कुस्तीला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि मल्लांना योग्य प्रशिक्षण व संधी उपलब्ध व्हावी, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश असून ही ऐतिहासिक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी देशासह राज्यभरातून कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page