जामखेड प्रतिनिधी,
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मत फुटल्याने सभापती आणि उपसभापतीपदी भाजपचे उमेदवार विजयी झाले. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना दिलेला हा धक्का मानला जात आहे. असे असताना आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी मात्र याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यावर फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या समर्थकांनी फाळके यांच्या बंगल्याजवळ जाऊन घोषणाबाजी केली आणि भितींवर काळ्या शाईने फुल्या मारत गद्दार असे लिहून निषेध व्यक्त केला. जामखेडमध्ये या निवडणुकीवरून भाजपमध्ये शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्यात वाद झाला. तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद रंगला आहे.
कर्जत आणि जामखेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिंदे आणि पवार यांच्यात चुरशीने लढली गेली. यामध्ये दोन्ही तालुक्यांत दोन्ही गटांना समान म्हणजे प्रत्येकी नऊ जागा मिळाल्या होत्या. जामखेडमध्ये चिठ्ठी टाकून पदाधिकारी निवडण्यात आले. त्यामध्ये भाजपचा सभापती तर राष्ट्रवादीचा उपसभापती झाली. कर्जतमध्ये मात्र फेरमतमोजणीची मागणी झाली. फेरमतमोजणीतही निकाल कायम राहिला.
मॅच टाय, पण रोहित पवारांचा ‘गेम’, राम शिंदेंची जबरी फिल्डिंग, सभापती-उपसभापतीपद दोन्ही मिळवलं!
त्यानंतर तेथे नुकतीच पदाधिकाऱ्यांची निवड झाली. सभापती पदाच्या निवडीत राष्ट्रवादीचे एक मत बाद झाले. त्यामुळे भाजपचा सभापती झाला. निवडणुकीच्या आधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले काकासाहेब तापकीर सभापती झाले. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीचे एक मत उघडपणे फुटले त्यामुळे दहा मते घेऊन भाजपचाच उपसभापती झाला.
हा निकाल आमदार रोहित पवार यांना धक्का देणारा मानला जात आहे. मात्र, पवार यांच्या कार्यकर्त्यांनी यासाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना जबाबदार धरले आहे. फाळके यांच्या बंगल्याला काळे फासण्यात आले. घोषणा देत बंगल्याच्या भिंतीवर गद्दार लिहीत फाळके यांच्या निषेधाच्या तर आमदार पवार यांच्या समर्थनाच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे कर्जतमध्ये या निवडणुकीवरून राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा वाद पहायला मिळाला. जामखेडमध्ये पूर्वीच भाजप विरूद्ध भाजप असा वाद रंगला होता.