आ. प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केला तारांकित प्रश्न
जामखेड प्रतिनिधी
शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या तारांचा मुद्दा, पिंपरी चिंचवड येथील रोहित्राचा स्फोटातील मृतांच्या वारसांना मदत व मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने जामखेड मधील नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू या तीन महत्वाच्या मुद्द्यांकडे आमदार प्रा राम शिंदे यांनी तारांकित प्रश्नाच्या माध्यमांतून सरकारचे लक्ष वेधले. पावसाळी अधिवेशनात आमदार प्रा.राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.
जामखेड शहरातील जुन्या डी. जे. हॉटेलच्या पाठीमागील भागातील एका घरावरून गेलेल्या मुख्य वीज वाहिनीला स्पर्श झाल्याने नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना मे २०२३ च्या चौथ्या आठवड्यात घडली होती. या घटनेवरून आमदार प्रा राम शिंदे यांनी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला.
आमदार प्रा राम शिंदे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांवर लेखी उत्तर देताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरात म्हटले आहे की, सदर घटना खरी असून जामखेड शहरातील मुख्य वीज वाहिनी इतरत्र हलविण्याबाबत जामखेड उप विभागात नागरिकांनी निवेदन सादर केले आहे.मयत मुलीच्या कुटुंबियांना महावितरणातर्फे तातडीची मदत म्हणून २० हजार रूपये देण्याकरीता महावितरणचे कर्मचारी गेले असता त्यांनी सदर रक्कम स्वीकारण्यास नकार दिला, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.११ के. व्ही. वीज वाहिनीमुळे अपघात टाळण्याकरीता तातडीची उपाययोजना म्हणून सद्य:स्थितीत जामखेड शहरातील अरुंद रस्त्यालगत असलेल्या ११ के. व्ही. वीज वाहिनीकरीता कोटेड कंडक्टरची व्यवस्था करण्यात आली असून सदर काम २ ते ३ दिवसात पूर्ण करण्यात येईल. असे ऊर्जामंत्र्यांनी म्हटले आहे.
राज्यातील शेतशिवारांमध्ये लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारा व डीपीच्या दुरुस्तीची कामे सुरक्षिततेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी करणेबाबत आमदार प्रा. राम शिंदे, आमदार रमेशदादा पाटील, आमदार उमा खापरे,आमदार प्रविण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रसाद लाड, आमदार रामदास आंबटकर,आमदार निलय नाईक, ॲड निरंजन डावखरे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, वीज ग्राहकांना उच्च दर्जाची सुविधा उपलब्ध करण्यासाठी महावितरणच्या धोरणानुसार राज्यात महावितरणच्या क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक देखभाल व दुरुस्ती आणि ब्रेकडाऊन मेंटेनन्स अंतर्गत प्रत्येक स्तरावर महावितरणच्या सुचिबध्द कंत्राटदाराकडून विद्युत तारा बदलणे, झोळ आलेल्या विद्युत तारा ओढणे, जंपर बदलणे, पोल बदलणे, झाडाच्या फांद्या तोडणे, स्टेला व्यवस्थित ताणे बसविणे, रोड क्रॉस गाळ्याला गार्डींग व्यवस्थित करणे, डीस्ट्रीब्यूशन बॉक्स दुरुस्ती करणे इ. कामे पावसाळा सुरु होण्यापूर्वी करण्यात येतात. त्यामुळे संभाव्य ब्रेकडाऊन किंवा वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याचे तसेच अपघात होण्याचे प्रमाण कमी झाले.
पिंपरी चिंचवड (जि. पुणे) परिसरातील भोसरी, इंद्रायणी नगर भागात रोहित्राचा स्फोट होऊन मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना भरपाई मिळणेबाबतचा तारांकित प्रश्न आमदार उमा खापरे, आमदार प्रसाद लाड, आमदार रमेशदादा पाटील, आमदार रामदास आंबटकर, आमदार ॲड निरंजन डावखरे, आमदार प्रा. राम शिंदे यांनी उपस्थित केला होता.
यावर उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की,भोसरी, इंद्रायणी नगर (पिंपरी चिंचवड, जि. पुणे) भागात रोहित्राचा स्फोट होऊन तिघे जण मृत्यूमुखी पडण्याची घटना घडली होती. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तिघांच्या वारसांना, महावितरणच्या नियमानुसार प्रत्येकी रुपये ४ लाख याप्रमाणे एकूण रुपये १२,००,०००/- दिनांक १२/१०/२०२० रोजी देण्यात आले आहेत.उर्वरित रकमेबाबतची कार्यवाही प्रक्रियाधिन आहे.
महावितरणने अपघातास दोषी असणाऱ्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन, चौकशीच्या अनुषंगाने ५ अधिकारी व २ कर्मचारी यांच्यावर कंपनीच्या नियमाप्रमाणे आरोपपत्र दाखल करुन व त्यांची चौकशी करुन, दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुध्द महावितरण कंपनीच्या नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे, असे लेखी उत्तरात म्हटले आहे.