*कर्जत जामखेडचे बस स्थानक होणार सुसज्ज; आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने कोट्यवधींचा निधी मंजूर*

*आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने 8.71 कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर*

कर्जत/ जामखेड | कर्जत जामखेड तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱ्या बस स्थानकाचे कॉंक्रीटीकरण करणे तसेच सुलभ शौचालय बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध झाला आहे. आमदार रोहित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामुळे आता कर्जत-जामखेड मधील आगार सुंदर आणि सुसज्ज होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, कामगार यांची गैरसोय टाळण्यासाठी जास्तीच्या बसेस दोन्हीही तालुक्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आमदार रोहित पवार यांच्यावतीने करण्यात आली होती, त्याही बसेस आता लवकरच उपलब्ध होणार आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि औद्योगिक महामंडळ (MIDC) यांच्यात नागपूर हिवाळी अधिवेशन दरम्यान 600 कोटी रुपयांचा करार झाला आहे. त्यातूनच मिरजगाव येथील बसस्थानकासाठी 1 कोटी 90 लक्ष तसेच कर्जत येथील बसस्थानकासाठी 1 कोटी 36 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. त्याचबरोबर जामखेड येथील बसस्थानकासाठी 4 कोटी 36 लक्ष रुपये आणि खर्डा कोल्हार बसस्थानकासाठी 1 कोटी 9 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत. कर्जत येथील बस स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी परिवहन महामंडळाला पत्र दिले होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या कामांना सरकार बदलल्यानंतर स्थगिती लावली होती. परंतु न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि कामे पूर्ववत झाली.

आमदार रोहित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ‘कर्जत जामखेड’साठी जास्तीच्या 30 बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाचे सचिव यांना तपासून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे परिवहन महामंडळाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार लवकरच नवीन 2000 बसेस महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. त्या आल्यानंतर कर्जत जामखेडसाठी बसेस उपलब्ध करून दिल्या जातील असे पत्राद्वारे सांगण्यात आले आहे.

यापूर्वी जामखेड येथे बस स्थानक पुनर्बांधनी व व्यापारी गाळे बांधकामासाठी पाच कोटींचा निधी आमदार रोहित पवार यांनी मंजूर करून आणला होता. तसेच कर्जत येथील २५ वर्षांपासून प्रलंबित असणारा डेपोचा प्रश्न देखील त्यांनी मार्गी लावला होता त्याचे काम देखील आता ९० टक्के पूर्ण झाले आहे. तसेच कर्जत, मिरजगाव व खर्डा येथे धुळीमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. परंतु आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करून बस स्थानकासाठी महत्त्वाचा असणारा काँक्रिटकरणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. आता नवीन बस प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार रोहित पवार प्रयत्न करत आहेत. यासोबतच बस डेपो चे काम पूर्ण झाल्यानंतर तेथील कामगार व डेपोचे नियोजन करावे लागते त्यासाठी देखील आमदार रोहित पवार यांचा पाठपुरावा शासन दरबारी सुरू आहे.

*प्रतिक्रिया*

सरकार कोणतेही असो मतदारसंघातील लोकांसाठी माझा पाठपुरावा हा कायम असाच सुरू राहणार तसेच माझ्या मतदारसंघातील जनतेला दिलेले बहुतांश शब्द मी जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करू शकलो, याचा आनंद आहे. आता राहिला प्रश्न तो एमआयडीसीचा तोही मी लवकरच मार्गी लावणार.

– *आमदार रोहित पवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *