*सभा स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या सह्याद्रीची या सभेने रोहित पवार यांच्या प्रचाराचा समारोप*
*राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची खास उपस्थिती*
कर्जत-जामखेड. १७-
आमदार रोहित पवार यांच्या गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेल्या प्रचाराची उद्या सोमवारी (दि.१८ नोव्हेंबर) ‘सभा स्वाभिमानाची महाराष्ट्राच्या सह्याद्रीची’ या सभेने सांगता होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार हे या सभेला संबोधित करणार असून ही सभा वालवड रस्ता, कर्जत येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघासह संपूर्ण राज्यात प्रचाराचा धडाका लावला आहे. गेली पाच वर्ष आमदार रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात केलेल्या आपल्या कामाच्या माध्यमातून गावोगावी सर्वसामान्यांशी थेट संपर्क प्रस्थापित केल्याने त्यांची निवडणुक गेल्या वेळेपेक्षाही अधिक जोमाने होत आहे. ही निवडणूक तळागाळातील नागरिकांनीच हातात घेतल्याचं चित्र पहिल्यांदाच पहायला मिळत असून मतदारसंघात त्यांच्या प्रचाराची धुरा कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांकडून वाहिली जात आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी मात्र महाविकासआघाडीच्या इतर उमेदवाराच्या प्रचारासाठी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात अनेक सभा घेऊन प्रचाराचा धुराळा उडवून दिला आहे.
आज ते पुन्हा कर्जत-जामखेड मतदारसंघातील गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधत आहेत. उद्या या निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार असून मागील निवडणुकीप्रमाणेच यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कर्जत सांगता सभा होणार असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे आमदार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हेही येणार होते आणि त्यामुळे कर्जत जामखेडकरांना दोन मोठ्या नेत्यांच्या सभांना उपस्थित राहण्याची संधी मिळणार होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून मतदारसंघातील राजकीय वातावरण बघितलं तर यामध्ये भाजप उमेदवाराचा विजय हा दृष्टीक्षेपातच नसल्याचे बघून केंद्रीयमंत्री अमित शहा यांनी सभेला येण्याचे टाळलं असल्याची जोरदार चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे. परंतु अमित शहा यांची सभा रद्द झाल्याने डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि दुधाची तहान ताकावर भागवण्यासाठी भाजपकडून आता केंद्रिय मंत्री जे.पी.नड्डा यांची सभा सभेला उपस्थित राहणार आहेत.
अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात ८५ व्या वर्षीही प्रचाराचा धुराळा उडवणारे आणि आपला करिष्मा दाखवून देणारे शरद पवार हे सांगता सभेत नातवाच्या कामगिरीविषयी काय बोलतात आणि कर्जत जामखेडकरांना काय आवाहन करतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे.