*भगवान साळुंखे सर यांचा सोन्याची अंगठी देऊन सत्कार…*
*नवोदय विद्यालय निवड परीक्षेतील यशाबद्दल केला गावकऱ्यांनी अनोख्या पद्धतीने सन्मान…*
जामखेड :- जामखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड येथे नवोदय निवड परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या अर्णव सुभाष ओमासे व त्याचे शिक्षक श्री भगवान साळुंखे सर यांचा सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.
या सोहळ्याचे आयोजन पालकांनी व गावकऱ्यांनी केले होते.
नुकत्याच झालेल्या नवोदय निवड परीक्षेमध्ये अर्णव सुभाष ओमासे याने यश संपादन केले आहे व त्याची इयत्ता सहावी या वर्गासाठी जवाहर नवोदय विद्यालय टाकळी ढोकेश्वर अहमदनगर येथे निवड झाली आहे.
त्याच्या या यशाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असतानाच आज पिंपरखेड गावामध्ये गावातील ग्रामस्थ व पालक या सर्वांच्या वतीने त्याचा व त्याचे मार्गदर्शक शिक्षक श्री भगवान साळुंखे सर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
या परीक्षेतील यशाबद्दल अर्णवचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तर मार्गदर्शक शिक्षक श्री भगवान साळुंखे सर यांचा उभा पोशाख, सोन्याची अंगठी, शाल, श्रीफळ व फेटा बांधून गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
अर्नवच्या कुटुंबीयांनी या सत्कार सामग्रीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी त्याचा पाया घडविणारे शिक्षक श्री कोथमीरे सर यांचाही फेटा व शाल देऊन सत्कार करण्यात आला.
गावकऱ्यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करत शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचा देखील फेटा बांधून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना श्री राजेंद्र ओमासे यांनी सलग तीन वर्षी मिळवलेल्या या यशात श्री भगवान साळुंखे सर यांची अतिशय जोरदार मेहनत, शिकविण्याची हातोटी व मुलांना दिलेले प्रोत्साहन याचे श्रेय असल्याचे सांगितले तसेच पुढील भविष्य काळात विद्यार्थ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे बोलून दाखविले.
या सत्कारास उत्तर देताना अर्णव ने आपल्या या यशात मार्गदर्शक शिक्षक व कुटुंबीय यांचा वाटा असल्याचे सांगितले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कष्ट घेणे व जिद्द बाळगणे गरजेचे आहे असे सांगितले.
या सत्कारास प्रसंगी मनोगत व्यक्त करताना श्री भगवान साळुंखे सर यांनी या केलेल्या सन्मानाबद्दल सर्व गावकऱ्यांचे आभार मानले व या यशामागे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब यांची प्रेरणा असल्याचे सांगितले.भविष्यामध्ये असे आणखी विद्यार्थी तयार करून अशी ग्वाही दिली.
याप्रसंगी श्री प्रवीण शिंदे सर, श्री सुभाष सरोदे सर, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन श्री तुकाराम लबडे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री रवींद्र इंगोले सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दत्ता भोसले, सुभाष ओमासे, राजेंद्र ढवळे, बाबासाहेब ढवळे, बाबासाहेब कदम, बापू गाडेकर मधुकर सर जरे मॅडम यांनी प्रयत्न केले.