जामखेड प्रतिनिधी,
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आता पक्के कर्जतकर झाले आहेत. पूर्वीच तालुक्यातील एका गावात त्यांनी शेती खरेदी केली आहे. आता कर्जत शहरात त्यांनी बंगला बांधला असून मंगळवारी (१३ जून) पूजा ठेवली आहे. याची निमंत्रणे त्यांनी विरोधीपक्षातील नेत्यांना जाहीरपणे पाठविली आहेत. या मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ‘बाहेरचे पार्सल’ म्हणून विरोधकांवर टीका होत असतानाच आमदार पवार यांनी दिनकर या आपल्या बंगल्याचे आणि त्याला जोडूनच असलेल्या कार्यालयाचे उद्घाटनाचा जाहीर कार्यक्रम ठेवत आपण आता कर्जतकर झाल्याचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पवार यांनी उमेदवारी मिळ्याआधीपासूनच तयारी सुरू केली होती. त्यावेळी त्यांना बाहेरचे म्हणून विरोधकांकडून हिणवले जात होती. त्यामुळे ऑगस्ट २०१९ मध्येच त्यांनी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी शिवारात दोन एकर शेत जमीन खरेदी केली. आपण कर्जत तालुक्याचे रहिवासी झाल्याचे त्यांनी यातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पुढे निवडणुकीत त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली. भाजपचे आमदार राम शिंदे यांचा पराभव करून ते विजयी झाले. तरीही विरोधकांकडून त्यांना ‘बाहेरचा’ असाच शिक्का मारला जात होता.
त्यांनी कर्जतला कार्यालय सुरू केले होते. आता त्याही पुढे जात त्यांनी कर्जत शहरातील कुळधरण रोडवर बंगला बांधला आहे. त्याला ‘दिनकर’ असे नाव दिले आहे. दिनकर म्हणजे सूर्य, कर्जत जामखेड हा मतदारसंघ अखंड ऊर्जेचा स्त्रोत आहे. त्यामुळे बंगल्याला हे नाव दिल्याचे त्यांनी निमंत्रण पत्रिकेत म्हटले आहे.
आता या बंगल्याची पूजा आणि कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे. याची निमंत्रणे दिली जात आहे. मंळवारी १३ जूनला होणाऱ्या या कार्यक्रमांची निमंत्रणे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना ट्विटरच्या माध्यमातून जाहीरपणे दिली आहेत.
गेल्या काही काळापासून विखे पाटील पिता-पुत्र आणि राम शिंदे यांच्यात पक्षांतर्गत संघर्ष सुरू आहे. विखे पाटील आणि पवार यांची छुपी युती असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. असे असताना दोन्ही तालुक्यांतील बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र पवार यांना शिंदे यांनी धक्का दिला आहे. छुपी युती नसल्याचे विखे पाटील यांच्याकडून सांगितले जात आहे.
सरकारी कार्यक्रमांसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसोबत एकत्र येतो, एकमेकांच्या पक्षीय अगर खासगी राजकीय कार्यक्रमासाठी नाही, असे स्पष्टीकरण एकदा खासदार विखे पाटील यांनी दिले होते. आता पवार यांच्याकडून आलेल्या या जाहीर निमंत्रणाला विरोधी लोकप्रतिनिधींकडून कसा प्रतिसाद दिला जातो, हे उद्याच पाहायला मिळेल.