सीना धरणातून आज आवर्तन सुटणार, जिल्हास्तरीय टंचाई बैठकीत झाला निर्णय*
*कार्यकारी अभियंत्यावर होणार निलंबनाची कारवाई – आमदार प्रा राम शिंदे*
*कर्जत-जामखेड :
कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरणातून आवर्तन सोडावे यासाठी आक्रमक झालेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांच्या मागणीला आज (12 रोजी) मोठे यश आले आहे. जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत शिंदे यांनी सीना धरणाच्या आवर्तनाचा मुद्दा गाजवला. आमदार शिंदे यांच्या मागणीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी तात्काळ सीना धरणातून आवर्तन सोडण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर कार्यकारी अभियंत्यावर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
आज १२ रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार प्रा.राम शिंदे आक्रमक झाल्याचे दिसून आले. सीना धरणात पाणी शिल्लक असतानाही कार्यकारी अभियंता देशमुख यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरले. जनतेसह शासनाची दिशाभूल केली. शेतकऱ्यांचे नुकसान केले. शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केल्याचा मुद्दा शिंदे यांनी उपस्थित करत देशमुख यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
आमदार राम शिंदे यांनी शेतकरी हितासाठी टंचाई आढावा बैठकीत आक्रमक भूमिका घेत सीना धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी केली. धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सीना धरणातून आजच्या आज पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिले. आमदार शिंदे यांच्या माध्यमांतून पुन्हा एकदा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, टंचाई आढावा बैठकीनंतर बोलताना आमदार प्रा.राम शिंदे म्हणाले की, सीना डॅम , निमगाव गांगर्डा ता.कर्जत मधून आवर्तन सोडण्याची मागणी केली असता पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आजच्या आज पाणी सोडण्याचा निर्णय दिला आहे,
आज आवर्तन सोडण्यात येणार आहे.तसेच आवर्तन सोडण्याबाबत कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिशाभूल केली व खोटी उत्तरे दिली आणि पाणी शिल्लक असुन देखील शेतकऱ्यांना वेठीस धरले व शेतकऱ्यांचे नुकसान केले शासनाच्या विरोधात चिड निर्माण होईल असे कृत्य केले म्हणून त्यांच्यावरती शिस्तभंगाची व निलंबनाची कारवाई करण्याचे बैठकीत ठरले, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.