*फायनलमध्ये भारताने आधी बॅटिंग करावी की बॉलिंग? किती धावा पुरेशा? पिच क्युरेटरनं सांगितला यशाचा मंत्र*

*फायनलमध्ये भारताने आधी बॅटिंग करावी की बॉलिंग? किती धावा पुरेशा? पिच क्युरेटरनं सांगितला यशाचा मंत्र*

अहमदाबाद: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ एकमेकांसमोर असतील. नरेंद्र मोदी स्टेडियमवर एक लाखांहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत अंतिम सामना खेळवला जाईल. यंदाच्या स्पर्धेत भारतीय संघ सलग १० सामने जिंकून अजिंक्य आहे. ही किमया ऑस्ट्रेलियाला जमलेली नाही. साखळीतील सुरुवातीचे दोन सामने त्यांनी गमावले. त्यानंतर त्यांनी सलग सात सामने जिंकत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा ३ गडी राखून पराभव करत कांगारुंनी अंतिम फेरी गाठली.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या पिच क्युरेटरनं महत्त्वाची माहिती दिली आहे. ‘अंतिम सामन्यात ३१५ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला जाऊ शकतो. अहमदाबादची खेळपट्टी साधारणत: फलंदाजांना मदत करते. पण आयसीसीची स्पर्धा असल्यानं आणि त्यातही अंतिम सामना असल्यानं खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाजांना सहाय्य करणारी असेल. पहिल्या डाव्यात ३१५ किंवा त्याहून अधिक धावा केल्यास जिंकण्याची शक्यता अधिक असेल. कारण दुसऱ्या डावात फलंदाजी करणं कठीण होईल,’ अशी माहिती क्युरेटरनं दिली.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी शुक्रवारी खेळपट्टीची पाहणी केली. यावेळी बीसीसीआयचे दोन वरिष्ठ ग्राऊंड स्टाफ, आशिष भौमिक आणि तपस चॅटर्जी त्यांच्यासोबत होते. राहुल आणि रोहित यांनी त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंग्सनंदेखील खेळपट्टीची पाहणी केली. ‘खेळपट्टीबद्दल माझ्या मनात कोणतीही चिंता नाही. कारण दोन्ही संघांना त्याच खेळपट्टीवर खेळायचं आहे,’ असं कमिंग्स म्हणाला.

आपल्या देशात, आपल्या खेळपट्टींवर खेळायचा थोडासा फायदा मिळतो. पण आम्ही इथे बऱ्यापैकी क्रिकेट खेळलो आहोत, असं कमिंग्सनं म्हटलं. सुरुवातीच्या काही षटकांमध्ये खेळपट्टीकडून वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल. चेंडू स्विंग होईल. पण त्यानंतर खेळपट्टी गोलंदाजांना फारशी मदत मिळणार नाही. त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच भारताला बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न करू. या मैदानात नाणेफेकीचा कौल फारसा महत्त्वाचा असेल असं वाटत नाही, असं मत कमिंग्सनं व्यक्त केलं.

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page