*जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी*
जामखेड प्रतिनिधी
जामखेड – जामखेड तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली नमाज पठन झाल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या .शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना झाली तालुक्यातील मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अजहा) गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी केली. ईदगाह मैदानावर मौलाना मुफ्ती अब्दुल आलीम पठाण यांनी नमाजाचे पठन केले .
यावेळी तालुक्यातील व शहरातील मुस्लिम बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
नमाजच्या प्रारंभी धार्मिक व्याख्यान, नमाजनंतर खुदबा व त्यानंतर मुस्लिम
बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. देशात शांतता, समृध्दी व सामाजिक सलोख्यासाठी प्रार्थना करण्यात आली. सकाळी साडे आठ वाजता ईदगाह मैदानावर व तालुक्यात व शहरातील विविध मशिदी मधून बकरी ईदची नमाज अदा करण्यात आली. मुस्लिम बांधवांनी एकमेकांच्या भेटी गाठी घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या.
पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी म्हणून पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ईदगाह मैदान, जयहिंद चौक , खर्डा चौक व शहरात आनेक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता .
नमाज पठणानंतर ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी , प्रा . लक्ष्मण ढेपे, ए पी आय वर्षा जाधव, सामाजिक राजकीय, पत्रकार आणि प्रशासकिय क्षेत्रातील व सर्व जाती धर्मातील नागरिकांनी मुस्लीम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या .
शहरातील चौका-चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाजानंतर शहरातील विविध कब्रस्तान व दर्गामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
या बकरी ईदनिमित्त कुर्बानीसाठी लागणारे बोकड खरेदी-विक्रीत तालुक्यात लाखो रुपयांची उलाढाल झाली. तालुक्यात विविध ठिकाणच्या आठवडे बाजारात बोकडांची खरेदी विक्री सुरूहोती. बकरी ईदला कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांच्या किंमतीमध्ये यावर्षी मोठी वाढ दिसून आली. बकरी ईदनिमित्त तीन दिवस म्हणजे गुरुवारपासून ते शनिवार पर्यंत घरोघरी कुर्बानी केली जाणार आहे. सोशल मीडियावर सर्व हिंदु बांधवांनी मुस्लीम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छां दिल्या .
![]()
