प्रांजलताई चिंतामणी यांच्या प्रयत्नांना प्रशासनाची साथ; १५ टँकरला मंजुरी

प्रांजलताई चिंतामणी यांच्या प्रयत्नांना प्रशासनाची साथ; १५ टँकरला मंजुरी

जामखेड शहरासह ३० वाड्या-वस्त्यांसाठी १५ टँकर मंजूर; दररोज सहा लाख लिटर पाणीपुरवठा होणार

जामखेड :

जामखेड शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर असतानाच नागरिकांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांच्या प्रयत्नांना यश आले असून, महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड नगरपरिषद हद्दीतील पाणीटंचाईग्रस्त ३० वाड्या-वस्त्यांसाठी १५ टँकरना मंजुरी मिळाली आहे. प्रत्येकी २० हजार लिटर क्षमतेच्या टँकरच्या दररोज ३० खेपा होणार असून, तब्बल सहा लाख लिटर पाणीपुरवठा केला जाणार आहे.

यामुळे सुमारे २० हजार नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबण्यास मदत होणार आहे.
जामखेड शहरातील विविध वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्र होत असल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नगराध्यक्षा प्रांजलताई अमित चिंतामणी यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

तहसीलदार जामखेड आणि नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी टँकर मंजुरीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता.


जामखेड शहराची तहान भागविण्यासाठी सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील मांदळी येथील पाणी उद्भवातून टँकरद्वारे पाणी आणले जाणार आहे. दरडोई ३० लिटरप्रमाणे २० हजार लोकसंख्येसाठी दररोज सहा लाख लिटर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आरोळेवस्ती, कोल्हे मळा, आजबेवस्ती, आयटीआय परिसर, द्रोणागिरी नगर, समता नगर, गुलमोहर नगर, म्हाडा कॉलनी, नवीन कोर्ट परिसर, बोराटेवस्ती, बेलेकरवस्ती, जगदाळेवस्ती, बटेवाडी, मोरेवस्ती, राळेभात वस्ती, संताजी नगर, जिजामाता नगर, विकास नगर, मार्केट यार्ड, धोत्री, लेहनेवाडी, जांबवाडी, शेळकेवस्ती, माने वस्ती, देशपांडे नगर, संपूर्ण कर्जत रोड, अंदुरे पंप परिसर, हिमालय पेट्रोल पंप परिसर, अहिल्यावस्ती, सम्राट फटाका दुकान परिसर, चुंबळी आणि जमादारवाडी या भागांना या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

दरम्यान, टँकरद्वारे पाणीपुरवठा पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. मंजूर खेपा प्रत्यक्ष पूर्ण झाल्या की नाहीत, याची खातरजमा करून तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांनी दररोज सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयाला अहवाल सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित वेळेनंतर विनाकारण उशीर झाल्यास टँकरच्या भाड्यात कपात करण्याची कारवाई होऊ शकते. तसेच टंचाईग्रस्त भागाच्या दीड किलोमीटर परिसरात पाणी उपलब्ध असलेल्या खासगी विहिरींचे प्रथम अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विहिरीत पाणी सोडताना जंतुनाशकांचा वापर आणि पाणी साठवणुकीसाठी सिंटेक्स टाक्यांची व्यवस्था करण्याची जबाबदारीही नगरपरिषदेवर सोपविण्यात आली आहे.

चौकट :

*पुढील टप्प्यात आणखी टँकर मंजुरीसाठी प्रयत्न*

भूतवडा तलावात पुढील एक महिना पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याने शहराच्या उर्वरित भागासाठी पुढील टप्प्यात आणखी टँकर मंजूर करून घेता येतील. त्यासाठीचा पाणी टँकर मागणीचा प्रस्ताव लवकरच प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. शहरातील एकही भाग पाण्यापासून वंचित राहू नये, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

— प्रांजलताई अमित चिंतामणी
नगराध्यक्षा – जामखेड नगर परिषद, जामखेड

Loading

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles