दिवाळीत जामखेडचा वीजपुरवठा अखंड ठेवा! – प्रा. मधुकर राळेभात
दिवाळीपूर्वी वीजवाहिन्या, रोहित्र आणि फिडरची पूर्वतपासणी करण्याची महावितरणकडे मागणी
जामखेड : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरातील वीजपुरवठा अखंडित आणि सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी जामखेड येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिले.
दिवाळी हा नागरिकांचा महत्त्वाचा सण असून, या काळात घरे, दुकाने, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोषणाई केली जाते. तसेच खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची मोठी गर्दी असते. अशा परिस्थितीत वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यास नागरिकांसह व्यापाऱ्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत अनावश्यक लोडशेडिंग तसेच देखभाल-दुरुस्तीच्या कारणास्तव वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरणने घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, जामखेड शहरातून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अनेक व्यापाऱ्यांच्या इमारतींची पडझड झाली असून, काही दुकानांच्या परिसरातील परिस्थितीही असुरक्षित बनली आहे. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात एक ते दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्यास अंधाराचा फायदा घेऊन दुकानांमध्ये चोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले आहे.
एकीकडे यंदा पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रत्येकाकडे दिवाळी सणासाठी मोठे आर्थिक उत्पन्न नसले, तरी उपलब्ध परिस्थितीत आनंदाचे चार क्षण मिळावेत, ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठा खंडित होणे किंवा चोरीसारख्या घटनांमुळे नागरिकांच्या सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, अशी अपेक्षा प्रा. राळेभात यांनी व्यक्त केली.
दिवाळीपूर्वी शहरातील वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर आणि अन्य विद्युत यंत्रणेची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती व पूर्वतयारी करावी. अनावश्यक लोडशेडिंग टाळावे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचारी आणि आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर जामखेड नगर परिषदेचे बांधकाम समिती सभापती तथा नगरसेवक मोहन पवार, माजी नगरसेवक अमित जाधव, युवा नेते ऋषिकेश मोरे, जमीर बारुद, शिवव्याख्याते प्रा. जाकीर शेख, महालिंग कोरे, पप्पू पालकर आदींच्या सह्या आहेत.
![]()
