प्रधानमंत्री पिक विमा योजना मोफत अर्ज भरून देण्याचे बाजार समितीचे नियोजन; लाभ घेण्याचे सभापती पै.शरद कार्ले यांचे आवाहन
जामखेड प्रतिनिधी,
अलिकडील काळातील पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे कधी नुकसान होईल हे सांगता येत नाही. यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीतून दिलासा मिळावा यासाठी शासनाच्या वतीने विम्याचा लाभ दिला जातो.
त्यानुसारच याही वर्षी शेतकऱ्यांना १ रूपयात पिक विमा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. मात्र त्याही पुढे जाऊन जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने तालुक्यात शेतकऱ्यांसाठी एकही रूपया न घेता जामखेड येथील बाजार समिती कार्यालयात मोफत पिकविमा भरून देण्याची व्यवस्था केली असून तालुक्यातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती व सर्व संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
यावर्षी प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत शासनाने सोयाबीन, ज्वारी, तुर, मुग, कपाशी, उडीद या पिकांना विमा संरक्षण दिले असून पिक विमा भरण्यासाठी हेक्टरी एक रूपया एवढी विमा हप्ता रक्कम तर सोयाबीन ५४०००/-, ज्वारी ३०,०००/-, तुर ३६८०२/-, मुग २२८००/-, उडीद २२८००/-, कपाशी ५१६००/-
ईतकी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम निश्चित केली आहे.
पिक विमा भरण्यासाठी स्वयंघोषित पिक पेरा, सातबारा उतारा ८अ उतारा, बँक पासबुक झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स ही कागदपत्रे आवश्यक असून पिक विमा भरण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे. तरी शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड जामखेड येथे येऊन लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावा असे आवाहन सभापती पै. शरद कार्ले, उपसभापती व सर्व संचालक मंडळ कृषी उत्पन्न बाजार समिती, जामखेड यांनी केले आहे.