अरणगाव येथे गणेश मुर्तीची विटंबना, ग्रामस्थांन कडुन घटनेचा निषेध, अरणगाव कडकडीत बंद
धार्मिक भावना दुखावल्याचा अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथील श्री. अरणेश्वर मंदिराच्या समोरील सभामंडपात मुलांनी बसविण्यात आलेल्या गणपतीच्या मुर्तीची विटंबना करण्यात आली आहे. तसेच मंदिराच्या गाभाऱ्याचे गेटचे कुलुप देखील तोडण्यात आले असुन घटनास्थळी अज्ञात इसमाची चप्पल देखील आढळून आली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अमोल सिताराम निगुडे (वय ४० वर्षे, धंदा- शेती, रा. अरणगाव, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दिली आहे. फीर्यादी हे आपल्या कुटुंबासह अरणगाव येथे राहतात. या मंदिराची देखरेख करण्याचे काम फीर्यादी अमोल सिताराम निगुडे हे करत आहेत, तर शिवानंदन त्रिंबक दावणगिरे हे या मंदिरात पुजारी आहेत.

दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास फीर्यादी अमोल निगुडे हे अरणगाव येथे असताना, त्यांना रोहीत चावरे (रा. अरणगाव) यांचा फोन आला. रोहीत यांनी सांगितले की, आज दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अरणेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस चप्पल सोडून दिली आहे. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यातील गेटचे कुलूप तोडले आहे. मंदिरासमोर असलेल्या सभासमांडपात एका मित्र मंडळाने बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीची देखील विटंबना करण्यात आली आहे.
ही माहिती मिळाल्यानंतर अमोल निगुडे यांनी ताबडतोब अरणेश्वर मंदिराकडे धाव घेतली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जमा झाले होते. फीर्यादी यांनी पाहणी केली असता वरील सर्व प्रकार प्रत्यक्षात त्यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर ग्रामस्थांनी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करून, अज्ञात इसमाविरुद्ध कायदेशीर तक्रार करण्यासाठी जामखेड पोलीस स्टेशन गाठले.
दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ३ ते ४ वाजेच्या दरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. या प्रकरणी अमोल निगुडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला फीर्याद दिली असून पुढील पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश अघाव हे करित आहेत.
![]()


