बांधखडक शिक्षणोत्सव’ हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरेल-गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे*

*पाचदिवसीय शिक्षणोत्सवात दिग्गज कवी,लेखक,वक्ते व उपक्रमशील शिक्षकांचे लाभले मार्गदर्शन*.

*लेझीम पथक,आनंदनगरी,चित्रप्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम ठरले लक्ष्यवेधी*

*बांधखडकसह वनवेवस्ती व चव्हाणवस्ती येथील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग*
———————————————
जामखेड: तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या प्रेरणेतून जि.प‌.प्रा.शाळा बांधखडक येथे दि.२१ते २५ नोव्हेंबर २०२३ या काळात संपन्न झालेल्या बांधखडक,वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या नायगाव केंद्रातील तीन शाळांचा संयुक्त ‘शिक्षणोत्सव’ हा सहशालेय उपक्रम यशस्वी व अनेक दृष्टीने ऐतिहासिक ठरला.
शनिवार दि.२५नोव्हेंबर २०२३ रोजी गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांच्या अध्यक्षतेखाली या शिक्षणोत्सवाचा समारोप झाला.अध्यक्षीय मनोगतात आदरणीय धनवे साहेबांनी तीनही शाळांतील शिक्षक,विद्यार्थी,ग्रामस्थ व विशेषत: बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिला या सर्वांचे भरभरून कौतुक केले. केवळ घोकंपट्टी म्हणजे शिक्षण नसून प्रत्येक विद्यार्थ्यातील सूप्त कला,क्रीडा व साहित्यिक मूल्य ओळखून त्यांचा विकास करत संस्कारी पिढी घडविणे व त्यासाठी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवणे हे खरे शिक्षण आहे.या शिक्षणोत्सवात कविसंमेलनातून मुलांना पाठ्यपुस्तकातील कविंना प्रत्यक्ष अनुभवता आले.दिग्गज कथाकारांच्या तोंडून दर्जेदार कथा सादरीकरणाचे प्रात्यक्षिक बघायला मिळाले.व्याख्यानांच्या माध्यमातून महापुरूष व प्रेरणादायी व्यक्तिंची चरित्रे ऐकता आली.सांस्कृतिक कार्यक्रमातून कलाविष्कारांचे दर्शन घडविता आले.बाल आनंद मेळावा (आनंदनगरी) अर्थात खाद्यपदार्थ ,स्टेशनरी,भाजीपाला,फळे ,किराणा यांच्या विक्रीतून व्यवहारज्ञान मिळाले.सुलेखन (सुंदर हस्ताक्षर )कार्यशाळेतून हस्ताक्षरे सुधारली.कार्यानुभव अंतर्गत कृतीसत्रातून टाकावू वस्तूतूनदेखील सौंदर्य फुलविता येते याचे ज्ञान व संस्कार मिळाले.या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा शिक्षणोत्सव राज्याला दिशा देणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरेल असे गौरवोद्गार गटशिक्षणाधिकारी मा.श्री.बाळासाहेब धनवे यांनी काढले.समारोप समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्री. केशव गायकवाड,केंद्रप्रमुख नारायण राऊत व किसन वराट,धामणगाव शाळेचे मुख्या.वाणी सर,जामखेड ऊर्दू शाळेचे शाकीर सर उपस्थित होते.शिक्षणोत्सव काळात अनेक ज्येष्ठ व उपक्रमशील शिक्षक बांधवांनी ‍सदीच्छा भेट देऊन मार्गदर्शन व सहकार्य केले.
समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक बांधखडक शाळेचे मुख्या.श्री.विकास सौने यांनी केले.ईशस्तवन व स्वागतगीताचे गायन माता पालक संघाच्या सदस्या सौ.रूपाली अरविंद घोडके यांनी अत्यंत सुरेल आवाजात केले.’शिक्षणोत्सवातील अनुभव’ या विषयावर कु.अंकिता उद्धव खाडे(चव्हाणवस्ती शाळा) व चि.सोहम गणेश पवार (वनवेवस्ती शाळा) यांनी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून तर श्री.मंगेश वारे व सौ.अर्चना विजय वारे यांनी पालक प्रतिनिधी(बांधखडक शाळा) म्हणून मनोगत व्यक्त केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून वनवेवस्ती शाळेचे मुख्या.श्री.नितीन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनोहर इनामदार यांनी केले.
या कार्यक्रमात बांधखडकच्या सुपुत्री कु. ताई शांतीलाल वारे यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन खूपच लक्ष्यवेधी ठरले.स्वत:ला joint pain (arthritis)चा दुर्धर आजार असतानादेखील त्यांनी आपल्यातील दिव्य व अलौकीक प्रतिभेच्या मदतीने साकारलेली चित्रे सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.गटशिक्षणाधिकारी धनवे साहेबांनी ‘गुणग्राहकता व संवेदनशीलता’ यांचे दर्शन घडवत स्वतः व्यासपीठावरून उतरत जागेवर जाऊन केलेल्या या भूमीकन्येच्या सत्काराने उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.लेझीम पथकातील बालकांनी अप्रतिम लेझीम नृत्य सादर करत सर्वांची मने जिंकली. तत्पूर्वी दि.२४नोव्हेंबर रोजी सकाळी १०:०० ते दु.२:०० यावेळेत रक्तदान शिबिर संपन्न झाले, ज्यास स्थानिक युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला,तर रात्री ८:०० वा.झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात श्रीगणेशवंदना,वारकरी दिंडी नृत्य,गोंधळगीत,फनी सॉंग,देशभक्तीपर गीत व राजा शिवछत्रपती हे कार्यक्रम शेकडो शिक्षणप्रेमी व कलारसिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले.यावेळी ग्रामस्थांनी प्रत्येक गीताला बक्षिसांचा वर्षाव करत ‘लाखमोलाचे’ भरीव योगदान दिले.
या संपूर्ण शिक्षणोत्सवाची संकल्पना बांधखडक शाळेचे ज्येष्ठ व उपक्रमशील शिक्षक श्री.मनोहर इनामदार यांची असून श्री. विकास सौने(बांधखडक शाळा),श्री.नितीन जाधव व श्री प्रविण शिंदे(वनवेवस्ती शाळा),श्री.बाबा चव्हाण व श्री.प्रमोद कचरे (चव्हाणवस्ती शाळा) या सर्व शिक्षकांनी व तीनही शाळांतील सर्व पालक ,ग्रामस्थ ,महिला तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य या सर्वांनी पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न व सर्वतोपरी सहकार्य केले. जि.प.अहमदनगरच्या ‘मिशन आपुलकी’ या उपक्रमांतर्गत लोकसहभागातून तब्बल पाचही दिवस अविरत प्रयत्न करून हा शिक्षणोत्सव यशस्वी व ऐतिहासिक केल्याबद्दल बांधखडकसह वनवेवस्ती व चव्हाणवस्ती या तीनही शाळांतील सर्व विद्यार्थी ,शिक्षक,पालक व ग्रामस्थांवर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *