*भक्तिमय वातावरणात कर्जतच्या शारदाबाई पवार सभागृहात पार पडला अखिल भारतीय सृजन भजन महास्पर्धेचा सोहळा*

*आमदार रोहित पवार आयोजित अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धेच्या पाचव्या पर्वाची मोठ्या उत्साहात सांगता; कर्जत नगरीत दुमदुमले स्वरनिनाद*

कर्जत | अनेक दिवसांपांसून प्रतिक्षा असलेली ‘अखिल भारतीय सृजन भजन महास्पर्धा – २०२३’ च्या पाचव्या पर्वाची अंतिम फेरी आणि बक्षीस वितरण समारंभ १९ ऑगस्ट रोजी अत्यंत भक्तीमय वातावरणात व  उत्साहात कर्जतच्या दादा पाटील महाविद्यालयातील शारदाबाई पवार सभागृहात पार पडला. आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून ५ वर्षांपासून या भजन स्पर्धेचे आयोजन केले जाते. एकूण ३ विभागात ही स्पर्धा पार पडली त्यामध्ये कर्जत जामखेड विभाग दक्षिण भारत विभाग व महाराष्ट्र राज्य विभाग असे तीन विभाग असून यंदाच्या पर्वात महाराष्ट्र स्तरावर भुवनेश्वर भजनी मंडळ जुन्नर यांनी प्रथम क्रमांक पटकावत रुपये ७५००० रोख आणि सन्मानचिन्ह मिळवले आहे. तसेच श्री समर्थ कृपा भजनी मंडळ पनवेल यांनी द्वितीय क्रमांक ५१ हजार व सन्मानचिन्ह व स्वरनिनाद भजनी मंडळ, संभाजीनगर यांनी तृतीय क्रमांक ४१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे पारितोषिक पटकावले आहे. राज्यातील विविध संतपीठांचे प्रमुख विश्वस्त/पदाधिकारी या मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत या स्पर्धेची सांगता झाली.

*स्पर्धेतील कर्जत जामखेड विभागात माऊली भजनी मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर स्वरगंधार भजनी मंडळ यांनी द्वितीय आणि स्वर साधना भजनी मंडळ यांनी तृतीय क्रमांक पटकावत अंतिम फेरीत मतदारसंघासह आपल्या भागाचेही नाव मोठे केले आहे*. तसेच दक्षिण भारत विभागातून सातेरी प्रासादिक संगीत संस्था गोवा यांनी प्रथम तर कोयंबतूर (तामिळनाडू) येथील पीएसबीबी मिलेनियम स्कूल यांनी द्वितीय आणि श्री रवाळनाथ प्रसादिक भजनी मंडळ कर्नाटक यांनी तृतीय क्रमांक पटकावले आहे.

राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून महाराष्ट्रासह इतर राज्यातून हजारो भजनी मंडळे या स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यांच्या भजनाचे सुरेल स्वर शारदाबाई पवार सभागृहाच्या परिसरात सकाळपासूनच निनादत होते. या स्पर्धेत पंडित शौनक अभिषेकी, श्री माऊली सावंत व श्रीधर भोसले यांनी परिक्षक म्हणून काम पाहिलं.

आपली अध्यात्मिक व सांस्कृतिक परंपरा ही केवळ राज्यातच नाही तर राज्याबाहेरही तेवढ्याच भक्तीभावाने जपली जात असल्याचा प्रत्यय या स्पर्धेच्या निमित्ताने आला. राज्यघटनेला अभिप्रेत असलेल्या समता, एकात्मता, बंधुता या बाबी अध्यात्माच्या माध्यमातून जपल्या आणि जोपासल्या जातात. त्यामुळं आपल्या दैनंदिन जीवनात अध्यात्माला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या अनुषंगाने ‘अखिल भारतीय सृजन भजन स्पर्धा’ भरवून हे महत्त्व अबाधित राखण्याचे काम आमदार रोहित पवारांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *