*कर्जत-जामखेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थीतीमुळे शेतकरी हवालदिल; सरकारची मदत मिळावी यासाठी तहसीलदारांना निवेदन*
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मित्र पक्ष व सर्व शेतकरी बांधवांनी कर्जत व जामखेड येथील तहसीलदारांना विविध मागण्यांसाठी दिले निवेदन*
कर्जत / जामखेड | कर्जत-जामखेड तालुक्यामध्ये यंदा हवा तसा पाऊस पडला नाही, शिवाय गेल्या महिनाभरात पावसाचा मोठा खंड पडल्याने दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभी पिके जळून गेली असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सर्व मित्र पक्ष व शेतकरी बांधवांनी एकत्र येत सरकारची मदत मिळावी यासाठी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत कर्जत जामखेड मतदारसंघात शेतकऱ्यांनी तूर, कापूस, मका, बाजरी, उडीद, मूग व सोयाबीन या पिकांसाठी विमा संरक्षण उतरवले आहे. त्यांना मिड सिझन Adversity अंतर्गत 25% रक्कम पिक विमा संरक्षण म्हणून मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. त्याच अनुषंगाने आता ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी यासह सध्या पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची विनंती देखील शेतकऱ्यांनी निवेदनात केली आहे. यासोबतच पिण्याच्या पाण्यासाठी मागील दोन महिन्यापासून अत्यंत बिकट अवस्था असल्याने रोहित पवार यांनी वैयक्तिक पातळीवर टँकर सुरू केले होते. शासनस्तरावर याबाबत ठोस निर्णय घेण्यात यावा याबाबतची मागणी देखील यावेळी केली आहे.
सध्या दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत शेतकरी व कष्टकरी उपलब्ध असलेल्या पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु महावितरणकडून करण्यात येणाऱ्या भारनियमनामुळे त्यांचे नियोजन कोलमडत आहे. त्यामुळे भारनियमन न करता अखंडित वीजपुरवठा सुरू राहावा असे देखील विनंती यावेळी दोन्ही तालुक्यातील तहसीलदारांना तहसील कार्यालयात भेटून शेतकरी बांधवांसहित मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून निवेदन दिले आहे.
संबंधित मागण्यावरती आता शासन नेमका काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.