*न्यायालयाच्या आदेशानंतरही स्थगित असलेली नगर विकास विभागाची जामखेड शहरातील कोट्यवधींची कामे होणार पूर्ववत*
*आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांना यश; न्यायालयाने सरकारच्या कारभारावर ओढले ताशेरे*
जामखेड | महाराष्ट्रात सत्ता बदल झाल्यानंतर नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील असंख्य कामांवर स्थगिती लावली होती. त्यामध्ये कर्जत जामखेड तालुक्यातील ही कोट्यवधींच्या कामांचा समावेश होता. वेळोवेळी पाठपुरावा करून व विनंती करूनही सरकारकडून मात्र या कामांवरील स्थगिती उठवण्यात येत नव्हती त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्यासह स्थानिक नागरिक व पदाधिकाऱ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावत कामावरील स्थगिती उठवून न्याय मिळावा यासाठी दाद मागितली.
त्यानंतर यापूर्वीच काही कामांवरील स्थगिती न्यायालयाच्या आदेशानंतर उठली. परंतु अनेक कामांवरील स्थगिती न्यायालयाच्या आदेशानंतरही उठवण्यात आली नव्हती त्यामध्ये जामखेड शहरातील नगरविकास विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तब्बल आठ कोटी रुपयांच्या कामांचा देखील समावेश होता.
परंतु अखेर आमदार रोहित पवार व कर्जत-जामखेडकर नागरिक यांच्या लढ्याला यश आले असून न्यायालयाने स्थगिती उठवल्यानंतरही कामे पूर्ववत झाली नसल्याने न्यायालयाने सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले यावेळी राज्याचे मुख्य सचिव यांनी लेखी स्वरूपात असे कळवले की सर्व कामांची स्थगिती तात्काळ स्वरूपात उठवण्यात येईल त्यामुळे न्यायालयात वारंवार केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून आता जामखेड शहरातील नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणारी कोट्यवधींची विकासकामे पूर्ववत होणार आहेत.
नगर विकास विभागाच्या अंतर्गत येणारी जामखेड शहरातील पूर्ववत होणाऱ्या कामांमध्ये पेविंग ब्लॉक बसवणे, रस्त्याचे डांबरीकरण, रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे, खडीकरण करणे, सीडी वर्क पुलाचे बांधकाम करणे, समाज मंदिर सुशोभीकरण, उद्यान निर्मिती करणे, सभामंडप बांधकाम करणे, कब्रस्तान व संरक्षक भिंत बांधकाम, स्वच्छतागृह बांधकाम तसेच जामखेड शहरात सेल्फी पॉईंट व सुशोभीकरण करणे यासोबतच सांस्कृतिक भवन बांधकाम, खुली व्यायाम शाळा, बाकडे आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम इत्यादी कामांचा समावेश आहे.
त्यामुळे ही तब्बल ८ कोटी रुपयांची नगर विकास विभागाची कामे आता न्यायालयाच्या आदेशानंतर पूर्ववत होणार आहे त्यामुळे या माध्यमातून सर्वसामान्यांच्या लढ्याला यश आल्याचे या माध्यमातून पाहायला मिळत आहे. याअंतर्गत सभामंडपाच्या बांधकामांमध्ये संत सावता महाराज मंदिर, संत वामनभाऊ मंदिर, श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, तुळजाभवानी मंदिर, मारुती मंदिर, लक्ष्मी मंदिर, लोहार देवी मंदिर इत्यादी मंदिरांचा त्यात समावेश आहे.
तसेच वार्ड क्र.19 मधील नेटके वस्ती पूल बांधकाम, वार्ड क्र.1 मध्ये डोके वस्ती सीडी वर्क बांधकाम वार्ड क्रमांक 21 मध्ये चुंबली ते वाघमोड वस्ती सिडी वर्क तसेच वॉर्ड क्र.12 मध्ये पोलीस स्टेशन ते करमाळा रोड सिडी वर्क पुलाचे बांधकाम करण्याच्या कामाला आता हिरवा कंदील मिळाला आहे. याव्यतिरिक्त इतरही कामे मार्गी लागणार आहेत..
*प्रतिक्रीया-*
माझ्या मतदारसंघासह राज्यातील विविध भागांमध्ये अनेक विकास कामांना सध्याच्या राज्य सरकारने राजकिय आकसापोटी स्थगिती लावली होती. परंतु सर्वसामान्य नागरिकांनी न्यायालयात दाद मागितल्यानंतर अखेर सर्वसामान्यांना न्याय मिळाल्याचे या माध्यमातून सिद्ध झाले आहे. कोणी कितीही राजकिय आकसापोटी अडवणूक करण्याचा प्रयत्न केला तरी जनसामान्यांच्या लढ्याला कायमच यश येते याचाच प्रत्यय या माध्यमातून आला आहे. मी याबद्दल सर्व नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो व मा. न्यायालयाचे आभार मानतो.
– *आमदार रोहित पवार*
(कर्जत – जामखेड विधानसभा)