*आमदार प्रा.राम शिंदे यांच्यावर भाजपने सोपवली मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मतदारसंघाची जबाबदारी*

*आमदार प्रा.राम शिंदे तातडीने झेलम एक्स्प्रेसने मध्यप्रदेशला रवाना  !*

जामखेड : मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पुन्हा सत्ता कायम ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार तयारी हाती घेतली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.या निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी भाजपने देशातील अनेक मोठ्या नेत्यांवर मध्यप्रदेशातील विविध मतदारसंघाच्या जबाबदार्‍या सोपवल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे.

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा असलेले विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा बालेकिल्ला अभेद्य रहावा यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. त्या अनुषंगाने भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र भाजपचे नेते राज्याचे माजी मंत्री तथा आमदार प्रा राम शिंदे यांच्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे. हा मतदारसंघ सिहोर जिल्ह्यात असून विदीशा लोकसभा मतदारसंघात बुधनी विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.  भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने आमदार प्रा राम शिंदे यांच्या खांद्यावर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवताच आमदार शिंदे हे मतदारसंघातील सर्व कार्यक्रम आटोपून गुरूवारी रात्री तातडीने झेलम एक्स्प्रेसने मध्यप्रदेशला रवाना झाले आहेत.

आमदार प्रा राम शिंदे यांच्यावर पक्षाकडून सातत्याने विविध राज्यांच्या निवडणुकांची जबाबदारी सोपवण्यात येत आहे. आता तर मध्यप्रदेश सारख्या मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत थेट मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांचे पक्षात महत्व वाढत असल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.

देशात विविध राज्यातील विधानसभा निवडणूका होऊ घातल्या आहेत. या निवडणूका जिंकण्यासाठी भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीने मैदानात उतरली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे भाग्यविधाते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार प्रा.राम शिंदे यांच्यावर पक्षाने तेलंगणा राज्यातील जगतीयाल जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. या जिल्ह्यातील कोरटला -20, जगतीयाल – 21, धर्मपुरी – 22 या तीन महत्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी आमदार प्रा.राम शिंदे यांना सोपवली आहे. या ठिकाणी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तत्पुर्वी पक्षाने 17 नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या बुधनी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.

आमदार प्रा राम शिंदे यांनी नुकताच तेलंगणा राज्याचा दौरा केला. यामध्ये त्यांनी तेलंगणातील २१ जगतियाल मतदारसंघाचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी या मतदारसंघातील कोअर कमिटी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी, मंडल अध्यक्ष, सचिव, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, विविध मोर्चाचे अध्यक्ष यांच्याह सोशल मिडिया प्रमुखांची कार्याशाळा घेतली होती. तेलंगणा दौर्‍यावरून महाराष्ट्रात परतलेल्या आमदार प्रा.राम शिंदे यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवाराजसिंह चौहान यांच्या मतदारसंघाच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यादृष्टीने आमदार प्रा राम शिंदे हे आज गुरुवारी मतदारसंघातील सर्व कार्यक्रम आटोपून रात्री झेलम एक्स्प्रेसने मध्यप्रदेशला रवाना झाले आहेत. उद्या 20 रोजी ते मध्यप्रदेशात होणाऱ्या पक्षाच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आमदार प्रा.राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने यापुर्वी गोवा, कर्नाटक राज्यातील निवडणुकांची जबाबदारीही सोपवली होती. आता तेलंगणा व मध्यप्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे. एकुणच आमदार.प्रा.राम शिंदे यांचे पक्षांतर्गत महत्व वाढत असल्याचेच यातून अधोरेखित होत आहे. आमदार प्रा.राम शिंदे हे पक्षसंघटनेत काम करणारे एकनिष्ठ नेतृत्व असल्याने त्यांना केंद्रीय पातळीवर सातत्याने वेगवेगळ्या जबाबदार्‍या देण्यात येत आहेत. आमदार प्रा.राम शिंदे यांच्यावर पक्षाकडून सातत्याने मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याने शिंदे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *