*शेतकरी,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्यावतीने केलेल्या आमरण उपोषणाला यश; महावितरणकडून सर्व मागण्या मान्य*

*राजकीय दबावापोटी उद्घटनानंतरही सुरू न झालेले घुमरी सबस्टेशनदेखील अखेर सुरू; शेतकऱ्यांना होणार फायदा*

कर्जत / जामखेड | कर्जत जामखेड मतदार संघातील विजेच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात यासाठी महावितरणकडे वारंवार निवेदने देऊन मागण्या करूनही महावितरण शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मित्रपक्ष, शेतकरी व नागरिकांनी एकत्र येत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. कर्जत येथील कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर बुधवारी हे उपोषण सुरू करण्यात आले होते. विजेच्या संबंधित असलेल्या समस्यांबाबतच्या अडचणी तात्काळ स्वरूपात सोडवल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा गर्भित इशाराही यावेळी देण्यात आला होता.

अखेर प्रशासनाने या आमरण उपोषणाची गांभीर्याने दखल घेत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली व उपोषणाच्या सर्व मागण्या मान्य करत आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती उपोषणकर्त्यांना केली. त्यामुळे विजेच्या संबंधित अडचणी सोडवण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला यश आल्याचे या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दरम्यान, आमदार रोहित यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या व काम पूर्ण झालेल्या घुमरी येथील वीज उपकेंद्राचे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झाल्यानंतरही ते राजकीय दबावापोटी अद्यापही चालू करण्यात आले नव्हते हे विज उपकेंद्र सुरू करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती. त्यानुसार घुमरी येथील वीज उपकेंद्र हे नागरिकांसाठी सुरू करण्यात आले आहे.

यासोबतच कर्जत-जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज पंपांना नियमित पूर्ण दाबाने वीज पुरवठा व्हावा, शेतीपंपाचे जळालेले रोहित्र विना विलंब बदलून मिळावेत, सिंगल फेजची मंजूर असूनही रखडलेली कामे पूर्ण व्हावीत यासोबतच मंजूर असलेली दिघोळ, चौंडी आणि चिलवडी येथील नवीन विज उपकेंद्राची आणि राशीन, मिरजगाव, भांबोरा, खांडवी आणि कुळधरण येथील उपकेंद्राची क्षमता वाढवण्याची कामे लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे, कर्जत विभागातील विविध महावितरणचे रिक्त पदे भरण्यात यावी तसेच RDSS योजनेतील विविध कामे सुरू करावी या प्रमुख मागण्यांसह हे आमरण उपोषण बुधवारी सुरू झाले होते.

या प्रमुख मागण्यांबरोबरच सध्याचा दुष्काळ लक्षात घेता शेतकऱ्यांना वीज बिलाची आकारणी होऊ नये, दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकरी, कष्टकरी यांना उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी भारनियमन करण्यात येऊ नये, याबरोबरच शेतीपंपाचे कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना वीज कनेक्शन व मंजूर रोहित्र त्वरित बसून द्यावे यासारख्या विविध मागण्या उपोषणकर्त्यांतर्फे करण्यात आल्या. त्यावर आता महवितरणे लेखी स्वरूपात उत्तर देत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि पुढे योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही देखील दिली आहे. त्यामुळे आता कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *