संतश्री गितेबाबा आणि संतश्री सितारामबाबा गडावर ९ कोटी रुपयांची विकासकामे

*संतश्री गितेबाबा आणि संतश्री सितारामबाबा गडावर ९ कोटी रुपयांची विकासकामे*

*न्यायाचार्य महंत डॉ. नामदेव शास्त्री आणि ह.भ.प. महालिंग महाराजांच्या हस्ते भूमिपूजन*

*आमदार रोहित पवार यांचे प्रयत्न*

जामखेड, प्रतिनिधी –

ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबा यांचे गुरु संतश्री गितेबाबा तसेच संतश्री सिताराम बाबा यांच्या खर्डा (ता. जामखेड) येथील गडावर विविध विकास कामांसाठी आमदार रोहित पवार यांनी ९ कोटी रुपये निधी मंजूर करुन आणला असून आज भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि सीताराम गडाचे मठाधिपती श्री महालिंग महाराज नगरे यांच्याहस्ते या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी आमदार रोहित पवार, ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे, संत मिराबाई संस्थानच्या ह.भ.प. राधाताई सानप महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप काका ढाकणे, भूमचे मा. आमदार राहुल जी मोटे, सौ. कुंती पवार, हरिभाऊ महाराज गिते, आसाराम महाराज साबळे यांच्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक आणि नागरीक उपस्थित होते.

खर्डा येथील संत श्री गितेबाबा आणि संत श्री सितारामबाबा या दोन्ही गडांना अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रात मोठे महत्त्व आहे. संत श्री गितेबाबा हे संत श्री भगवान यांचे गुरु असून याच गडावर संत श्री भगवानबाबा यांची पालखी पंढरपूरकडे जाताना विसाव्यासाठी थांबत असते. तसेच संत श्री सिताराम बाबा यांचे कार्यही मोठे आहे. याच भागात असलेला खर्ड्याचा ऐतिहासिक शिवपट्टण किल्ला तसेच किल्ल्यासमोर असलेला जगातील सर्वांत उंच भगवा स्वराज्य ध्वज पाहण्यासाठीही अनेक पर्यटक येत असतात. या निमित्ताने तेही गडावर दर्शनसाठी येतात.

त्यामुळे दोन्ही गडांवर भाविकांची दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते. या भाविकांना पुरेशा सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या गडाचे धार्मिकदृष्ट्या महत्त्व वाढवण्याच्यादृष्टीने आमदार रोहित पवार यांनी गडाच्या विकासाचे काम हाती घेतले. सर्वप्रथम संत श्री सिताराम बाबा गड आणि संत श्री गितेबाबा गड या दोन्ही देवस्थानांना ब वर्ग दर्जा मिळवून दिला. तसेच प्रशस्त रस्ते, पाणीपुरवठा यांसह आता गडावर विविध विकासकामांसाठी आमदार रोहित पवार यांनी तब्बल नऊ कोटी रुपये निधी मंजूर करुन आणला. यामध्ये संत श्री गितेबाबा गडावर सभामंडप, महंत निवासस्थान, प्रसादालय आणि स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहे तर संत श्री सितारामबाबा गडावर सभामंडप व महंत निवासस्थान बांधण्यात येणार आहे. या कामांचा भगवानगडाचे महंत न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री आणि संत श्री सिताराम बाबा गडाचे मठाधिपती श्री महालिंग महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज जंजिरे यांचे सुश्राव्य हरिकिर्तन आणि महाप्रसादाचा कार्यक्रमही झाला.

यावेळी बोलताना न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी श्री क्षेत्र भगवानगडावर सुरु असलेल्या विकासकामांचा आढावा घेतानाच गडाच्या परंपरेवरही प्रकाशझोत टाकला. तसेच संत श्री गितेबाबा आणि संत श्री सिताराम बाबा गडाला उभारी देण्याची आज जी कामे सुरु आहे त्याचे संपूर्ण श्रेय हे आमदार रोहित पवार यांचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. ही कामे यापूर्वीच व्हायला हवी होती अशी डॉ. नामदेव शास्त्री महाराज यांची इच्छा होती, परंतु विविध कारणांनी ते झाले नाही. यावरुन हे काम केवळ आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातूनच व्हायचे होते की काय, म्हणूनच इतकी वर्षे थांबले होते असेच म्हणावे लागेल.

संतश्री गितेबाबा आणि संतश्री सितारामबाबा गडावरील विकासकामांसह मतदारसंघातील इतरही धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळांच्या विकासासाठी दोन वर्षापूर्वीच कोट्यवधी रुपये निधी मंजूर करुन आणला. परंतु मतदारसंघातीलच माझ्या विरोधकांच्या दबावामुळे या निधीला स्थगिती देण्यात आली होती. ती न्यायालयात जाऊन उठवावी लागली. स्थगिती नसती तर आतापर्यंत यातील अनेक कामे पूर्णत्वास गेली असती. ही सर्व कामं करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो. यामध्ये मी केवळ निमित्तमात्र असून संतांच्या आणि मतदारसंघातील नागरिकांच्या आशीर्वादामुळेच ही कामं करता आली, याचं समाधान आहे.

रोहित पवार
(आमदार, कर्जत-जामखेड)

Loading

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page