*तहानलेल्या कर्जत जामखेड तालुक्यातील नागरिकांना आ. रोहित पवार यांनी सुरू केलेल्या खासगी पाण्याच्या ३५ हून अधिक टँकरचा आधार*

*आमदार रोहित पवार यांनी सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून वर्कऑर्डर मिळूनही मतदारसंघात सरकारी टँकरचा थांगपत्ता नाही*

कर्जत/ जामखेड | आधीच अवर्षन प्रवण क्षेत्र असलेल्या कर्जत जामखेड मतदारसंघात यंदाच्या पावसाळ्यात नगण्य पाऊस झाला असल्याने कर्जत जामखेड तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार हे मागील काही महिन्यांपासून स्वखर्चाने ३५ हून अधिक टँकरद्वारे नागरिकांना पाणीपुरवठा करीत आहेत. अशातच सरकारतर्फे कर्जत-जामखेड मतदारसंघातील पाण्याच्या टँकरचे १३ गावांचे वर्क ऑर्डर निघाले असताना देखील प्रत्यक्षात मात्र ३ गावातच टँकर पाहायला मिळत आहेत आणि जे पाणी मिळत आहे ते देखील स्वच्छ नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे, पण आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या खासगी टँकरचा मोठा आधार  मतदारसंघातील नागरिकांना मिळत आहे. यासोबतच आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून नागरिकांसाठी मोफत पाण्याचे टँकर सुरू केले आहेत.

आमदार रोहित पवार यांनी शासनाकडून टँकर सुरू करण्यात यावे यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करून, संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन विनंत्या देखील केल्या आहेत. पण, सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि दुर्लक्षामुळे वस्तुतः फक्त ३ टँकर्स पाणी पुरवठा करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सरकारकडून पाण्याच्या बाबतीत दिरंगाईचे धोरण अवलंबिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

काही दिवसांपूर्वीच मतदारसंघात चारा छावण्या सुरू कराव्यात आणि पाण्याचे टँकर सुरू करावे या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मित्र पक्षांनी मिळून कर्जत जामखेड मतदारसंघात आंदोलनही केलं होतं. परंतु सरकारकडून मात्र अजुनही कोणता ठोस निर्णय घेऊन मतदारसंघांतील नागरिकांना दिलासा देण्याची हालचाल होत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

*प्रतिक्रिया*

कर्जत जामखेड मतदारसंघात पाण्याचे टँकर सुरू व्हावे व चारा छावण्या सुरू व्हाव्यात यासाठी मी काही दिवसांपूर्वीच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची भेट घेत मागणी केली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मित्र पक्ष, शेतकरी व नागरिकांनीही एकत्र येत आंदोलन केले होते. सध्याची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सरकारने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना याबाबतीत केवळ दिरंगाई केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे जे अत्यंत दुर्दैवी आहे. मतदार संघात आमच्या माध्यमातून खाजगी टॅंकरने पाणीपुरवठा देऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच शिवाय गेल्या ३-४ वर्षात जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा व्यक्तिगत पातळीवर टँकर ऊपलब्ध करून आम्ही नागरिकांना पाणी उपलब्ध करून दिले. सरकारनेही आता याकडे दुर्लक्ष न करता तातडीने टँकर सुरू करून सर्वसामान्यांची अडचण सोडवण्याबाबत निर्णय घ्यावा ही कळकळीची विनंती.

– *आमदार रोहित पवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *