स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त, एकाला घेतले ताब्यात..
जामखेड | प्रतिनिधी
जामखेड शहरातील मोहंमदीया मस्जिदजवळ पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तीन गोवंशीय जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेने सुटका केली. या कारवाईत पोलिसांनी सकलेन कदीर कुरेशी (वय २४, रा. कुरेशी मोहल्ला, जामखेड) याला ताब्यात घेतले असून, दोन गायी व एका वासरासह सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच कत्तलीच्या उद्देशाने होणारी जनावरांची वाहतूक रोखण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत करण्यात आले होते.
७ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांबाबत माहिती घेत असताना, मोहंमदीया मस्जिदजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये तीन गोवंशीय जनावरे कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी शेडमध्ये एक व्यक्ती आणि तीन गोवंशीय जनावरे आढळून आली. पोलिसांनी सकलेन कदीर कुरेशी याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचे त्याने सांगितले.
कारवाईदरम्यान ६० हजार रुपये किमतीच्या दोन गायी आणि २० हजार रुपये किमतीचे एक वासरू, असा एकूण ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सुटका करण्यात आलेल्या जनावरांना पुढील कार्यवाहीसाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५३१/२०२६ अन्वये महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९९५ (सुधारित २०१५) मधील कलम ५(ब), ९ तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याबाबतच्या कलम ३ व ११ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जामखेड पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड तसेच पोलीस अंमलदार अतुल लोटके, निळकंठ कारखिले, रोहित मिसाळ, प्रताप देवकाते, बाळासाहेब गुंजाळ आणि महिला पोलीस अंमलदार किरण ठुबे यांच्या पथकाने केली.
![]()
