भर उन्हात जामखेडमध्ये दुसर्या दिवशी ही मुस्लिम बांधवांचा पावसासाठी सामूहिक नमाज व दुवा
बुधवार, गुरुवार व शुक्रवार तीन दिवस नमाज पठण होणार
जामखेड प्रतिनिधी –
जामखेड तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधनाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पावसासाठी जामखेड शहरात मुस्लिम बांधवांनी सामूहिक इस्तिस्का नमाज अदा करून अल्लाहकडे पावसासाठी साकडे घातले. उद्या गुरुवारी व परवा शुक्रवारी पण दुपारी नमाज पठण होणार आहे.भर उन्हात मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्र आले. यावेळी नमाज अदा केल्यानंतर पावसासाठी विशेष दुवा करण्यात आली. “हे परवरदिगार, रहमतची बारिश आता फरमा आणि आम्हा सर्वांना या संकटातून वाचव. पशु-पक्षी व मुक्या प्राण्यांवर दया कर,” अशा भावनिक शब्दांत पावसासाठी प्रार्थना करण्यात आली.यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला आहे.
पिके पाण्याअभावी अडचणीत आली असून तलाव, विहिरी आणि अन्य जलस्रोतांमधील पाणीसाठाही कमी होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक तसेच पशुधनासाठी परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत आहे.या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांनी तीन दिवस इस्तिस्का नमाज अदा करण्याचा निर्णय घेतला आहे.पावसासाठी सामूहिक दुवा करताना समाजातील सर्व घटकांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच दुष्काळसदृश परिस्थितीतून लवकर सुटका व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात येत आहे.

पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या नागरिकांच्या भावना यावेळी प्रकर्षाने जाणवल्या. आभाळ निरभ्र असले तरी नागरिकांच्या नजरा मात्र काळ्या ढगांच्या प्रतीक्षेत आणि ओठांवर पावसासाठीची दुवा होती.पाऊस पडावा, शेतीला जीवदान मिळावे, पशु-पक्ष्यांची तहान भागावी आणि संपूर्ण परिसरावरील पाणीटंचाईचे संकट दूर व्हावे, यासाठी मुस्लिम बांधवांनी केलेल्या या सामूहिक प्रार्थनेने जामखेडमध्ये धार्मिक श्रद्धेसोबतच माणुसकीचा आणि मुक्या जीवांबद्दलच्या संवेदनशीलतेचा संदेश दिला.
![]()
