आढाषी एकादशी व बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने मुस्लिम समाजाकडून शांतता समिती बैठकीत निर्णय जाहीर
आगामी दि. २९ जून रोजी राज्यातील हिंदू बांधवांसाठी महत्त्वाची असलेली आषाढी एकादशी व मुस्लीम बांधवांचा बकरी ईद एकाच दिवशी येत असल्याने बकरी ईद दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. ३० जून रोजी साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला असल्याचे मौलाना खलील यांनी जाहीर केले आहे.
तसेच या दरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने काल दि. २४ जून रोजी शांतता समीतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी काही मार्गदर्शक सुचनांचे पालन करून बकरी ईद सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील, मौलाना खलील कासमी, सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, माजी नगरसेवक अर्शद शेख, उमर कुरेशी, कल्लीमुल्ला कुरेशी, मोहम्मद कुरेशी, गुलाम कुरेशी, वाहेद पठाण, हनीफ कुरेशी, अबरार कुरेशी, आदिंसह १५ मान्यवर उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचना
१) सोशल मीडिया वापरत असताना आपण कुठल्याही धर्माच्या भावना दुखावतील असे आक्षेपहार्य मेसेज कोणाला पाठवू नये.२) कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे कृत्य करू नये. जेणेकरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. ३)बकरी ईद व आषाढी एकादशी हे सण एकाच दिवशी आल्याने उघड्यावर कुरबानी करू नये. ४)बकरे कापल्यानंतर त्यांची वेस्टेज हे उघड्यावर तसेच रस्त्याच्या कडेला न फेकता ते खड्डा करून झाकून टाकावे.
त्यामुळे आषाढी एकादशी दिवशी बकरी ईद साजरी होणार नाही असा निर्णय सर्वानुमते झाला आहे. तरी वरील सर्व सूचनाचे पालन करून आषाढी एकादशी व बकरी ईद हे सण साजरे करावेत व समाजात शांतता राखावी असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील व शांतता समितीच्या वतीने करण्यात आले आहेत.