*• जामखेड तालुक्यातील श्री जवळेश्वर देवस्थानाला (जवळा) तीन कोटी रुपये निधी मिळणार*
*• महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश…*
*• भाविकांकडून स्वागत आणि आनंद…*
मुंबई, दिनांक ३० जुलै, 2026 (प्रतिनिधी / वार्ताहर)
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत आणि जामखेड तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ विकास योजना (ब वर्ग) अंतर्गत भरीव आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार जामखेड तालुक्यातील श्री जवळेश्वर देवस्थानाला (जवळा) तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. 29 जुलै, 2026 रोजी ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक: तीर्थवि-2026/ई-1773685/यो-11 अन्वये श्री जवळेश्वर देवस्थानासाठी प्रसादालय इमारत बांधकाम निधी अंदाजपत्रकीय रक्कम 5 कोटी 80 लाख 26 हजार 171 रुपये पैकी 3 कोटी रुपये रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे.

त्याचप्रमाणे कर्जत-जामखेड तालुक्यांतील अन्य देवस्थानांनाही लवकरच निधी वितरित केला जाणार आहे. जामखेड तालुक्यातील श्री जवळेश्वर देवस्थान (जवळा) या तीर्थक्षेत्राला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा बहाल करण्यात यावा यासाठी, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यानुसार यापूर्वीच या तीर्थस्थानाला ‘क’ वर्गातून ‘ब’ वर्गाचा दर्जा बहाल करण्यात आला. आता श्री जवळेश्वर देवस्थानाला (जवळा) तीन कोटी रुपयांचा भरीव निधी देखील प्राप्त झाल्याने समस्त भाविकांनी या निर्णयाचे स्वागत करीत देवस्थान विकास कार्याला प्रारंभ होणार असल्याने आनंद व्यक्त केला आहे.
या देवस्थानासाठी भरीव निधी वितरित झाल्याने आता भाविकांच्या सुविधेसाठी प्रसादालय इमारत बांधकामास गती मिळणार आहे. राज्य निकष समितीने
28 फेब्रुवारी 2026 रोजी घेतलेल्या बैठकीत या प्रस्तावांची सविस्तर छाननी करून त्यांना मंजुरी दिली होती, त्यानंतर शासन निर्णय आणि आता 3 कोटी रुपये निधीस प्रशासकीय मंजूरी देण्यात आल्याने या भागातील धार्मिक पर्यटनाला आणि स्थानिक रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.
विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या या विकासवादी भूमिकेमुळे आणि यशस्वी पाठपुराव्यामुळे कर्जत-जामखेडमधील तीर्थक्षेत्रांचा कायापालट होणार असून, या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यातून स्वागत आणि कौतुक होत आहे तसेच भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लवकरच कर्जत तालुक्यातील श्री जगदंबा देवस्थानाला (कुळधरण) आणि श्री लालगीर बुवा मठ ट्रस्टला (मांदळी) या दोन देवस्थानांना देखील निधी उपलब्ध होणार आहे.
![]()

