जवळा सोसायटीमार्फत नवीन कर्जदारांना पीक कर्जाचे वाटप – संचालक अमोल राळेभात

 

जामखेड प्रतिनिधी,

जवळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी संकरित गायीसाठी तसेच नवीन व बिगर कर्जदार सभासदांना रब्बी पीक कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेकडून संचालक श्री.अमोल दादा राळेभात यांनी कर्ज मंजूर करून घेतले. जवळा संस्थेच्या कार्यालयात संचालक श्री.अमोल दादा राळेभात यांच्या हस्ते संकरीत गाया घेणेसाठी चेक वितरित करण्यात आले.तसेच १२९ नवीन सभासदांचे पीक कर्ज केसीसी खाती जमा करण्यात आले.

जवळा सोसायटी ही जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी संस्था असून या संस्थेचे ३०६० सभासद आहेत. संस्थेच्या कर्जदार सभासदांना १६ कोटी २६ लाख रु.कर्ज वाटप केलेले आहे. तसेच संस्थेने मागणी केलेल्या नवीन १२९ सभासदांना पीक कर्जासाठी ७५ लाख ९७ हजार तर १० सभासदांना संकरीत गायीसाठी २४ लाख रु.कर्ज मंजूर केले असल्याची माहिती बँकेचे संचालक श्री.अमोल दादा राळेभात यांनी दिली. जिल्हा बँक नेहमी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून बँकेच्या विविध कर्ज योजनेच्या माध्यमातून अत्यंत अल्प दरामध्ये कर्ज सुविधा उपलब्ध करून देत आहे.

बँकेमध्ये कर्मचारी संख्या कमी असतानाही बँकेचे काम अत्यंत सुरळीत व वेळेत पूर्ण केले जात आहे.कर्ज वसूली ही संस्थेचा व बँकेचा कणा असून ज्याप्रमाणे आपण कर्ज घेतो.त्याप्रमाणे घेतलेले कर्ज फेडणे ही आपली जबाबदारी आहे. तसेच नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना शासनाकडून व्याज सवलत दिली जाते.त्यामुळे घेतलेल्या पीक कर्जाची परतफेड करून शासनाच्या व्याज सवलत रकमेचा लाभ घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी जवळा सोसायटीतर्फे बँकेचे संचालक मा.श्री.अमोल दादा राळेभात यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन शहाजी आप्पा पाटील, व्हा.चेअरमन शिवाजी तुकाराम कोल्हे,संचालक बारस्कर नवनाथ पोपट, हजारे राजेंद्र रामचंद्र, लेकुरवाळे अविनाश काकासाहेब, मते काशिनाथ गहिनाथ, पागीरे चंद्रहार किसन, रोडे अरुण नामदेव, वाळुंजकर कैलास महादेव संचालिका शेख सायरा सत्तार सचिव दादा चव्हाण याशिवाय राजेंद्र मोटे, राजाभाऊ सुळ, भाऊसाहेब सुळ, किसन गोयकर, कानिफनाथ मते, रामलिंग हजारे, हरिदास काळदाते तसेच संस्थेचे अनेक सभासद, कार्यकर्ते हजर होते.

संस्थेचे चेअरमन श्री. शहाजी अप्पा पाटील यांनी बँकेचे संचालक श्री.अमोल दादा हे स्वत:चा संपूर्ण वेळ हा शेतकऱ्यांसाठी देत असल्याचा खास नामोल्लेख केला. बँकेमध्ये कर्मचारी संख्या खूपच कमी असतानाही बँक सेवक हे अत्यंत चांगली सेवा देत असल्याचे नमूद करून उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *