तालुक्यातील अनेक गावांतील शेतकऱ्यांची जिल्हा बॅंकेच्या जामखेड शाखेकडून अडवणूक, शेतकऱ्याच्या वतीने उपोषण करण्याचा सभापती शरद कार्ले यांचा इशारा

जामखेड प्रतिनिधी:-

जामखेड तालुक्यातील घोडेगांव, पाटोदा, डिसलेवाडी, जातेगांव, धनेगाव या गावांमधील शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च पूर्वीच आपल्या कर्जाचा भरणा केलेला असतानाही या गावच्या विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थांना कर्जपुरवठा करण्यास अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जामखेड शाखेकडून अडवणूक होत असून ही अडवणूक थांबवावी व संबंधित गावांच्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे करण्यात आली आहे.

तसेच याबाबत त्वरित तोडगा काढून तातडीने कर्ज पुरवठा करावा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अहमदनगर येथील मुख्य शाखेसमोर, येथे उपोषण करण्याचाही इशारा या निवेदन देण्यात आला आहे .
याबाबतचे रितसर निवेदन देण्यात आले असून या निवेदन म्हटले आहे की, जामखेड तालुक्यातील घोडेगांव, पाटोदा, डिसलेवाडी, जातेगांव, धनेगांव या गावातील शेतकऱ्यांनी दि. ३१ मार्च पूर्व आपल्या कर्जाचा भरणा केलेला आहे. परंतू मागील काही दिवसांपासून वरील गावच्या शेतकऱ्यांची कर्जासाठी अडवणूक केली जात आहे.

तसेच अद्याप पर्यंत या सोसायट्यांना कर्ज वाटप केलेले नाही. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असलेमुळे शेतकऱ्यांचे उत्पादनात घट झाली अशा परिस्थितीमध्ये जर शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा झाला नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येऊ शकते.

तरी आपण सदर अर्जाची दखल घेऊन जामखेड तालुक्यातील १) घोडेगांव वि.का.से. सहकारी संस्था, २) पाटोदा वि.का. से. सहकारी संस्था, ३) किसानक्रांती वि.का.से. सहकारी संस्था, डिसलेवाडी ४) जातेगांव वि.का. से. सहकारी संस्था, ५) धनेगांव वि.का.से. सहकारी संस्था या सर्व संस्थांना तात्काळ कर्ज पुरवठा करावा अन्यथा आम्ही सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य शाखा, स्टेशन रोड, अहमदनगर येथे उपोषणास बसणार आहोत याची दखल घ्यावी व तात्काळ कर्ज पुरवठा करावा.

अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या निवेदनावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पै .शरद कार्ले, संचालक तथा नाहुली सेवा सोसायटीचे चेअरमन सचिन घुमरे, डिसलेवाडी सोसायटीचे चेअरमन डॉ. गणेश जगताप वंजारवाडी सोसायटीचे चेअरमन भागवत जायभाय ,घोडेगांव सोसायटीचे चेअरमन विष्णू भोंडवे, धनेगाव सोसायटीचे चेअरमन तुराब शेख यांच्या सह्य़ा आहेत. तसेच निवेदन देताना हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *