*मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व पालखी आणि दिडींचे प्रथमोपचार पेटी भेट देऊन होतंय स्वागत; आ. रोहित पवार यांचा स्तुत्य उपक्रम*
कर्जत / जामखेड | सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. “जय हरी विठ्ठल” या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर वर्षी या उत्सवात सामील होतात. अशातच कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या छोट्या-मोठ्या सर्वच पालख्या व दिंड्या आणि त्यात सामील झालेल्या वारकऱ्यांची आरोग्याशी संबंधित असलेल्या विविध अडचणी सोडवण्याच्या हेतूने आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पालखीच्या विविध मार्गावर करण्यात आले आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघातून राज्याच्या विविध जिल्ह्यातून येणाऱ्या अनेक महत्त्वाच्या दिंड्या पंढरपूरकडे जात असतात. तसेच विविध भागातून हजारो वारकरी या दिंड्यांमध्ये सामील होत असतात. पायी दिंडीत जात असताना सर्दी, पडसे, पायाला दुखापत होणे इत्यादी व्याधींवर उपचार मिळावे यासाठी आमदार रोहित पवार यांनी डॉक्टरांची तुकडी व हेल्थ कॅम्प मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व पालखी मार्गावर ठेवल्या आहेत. जेणेकरून वारकऱ्यांना आपल्या मार्गातच विविध व्याधींवर उपचार मिळत असून तात्काळ प्रथमोपचार व आवश्यक ती औषधेही मोफत मिळत आहेत. शिवाय वॉटरप्रुफ मंडप टाकून लांबून येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांची राहण्याची देखील उत्तम सोय करण्यात आली आहे. तसेच पाण्याचे टँकर व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे मतदारसंघात येणाऱ्या सर्वच दिंड्यांचे आणि पालखीचे स्वागत करत असताना प्रत्येक दिंडी आणि पालखीला प्रथमोपचार पेटी भेट म्हणून दिली जात आहे. अतिशय उत्तम आणि स्तुत्य उपक्रम यामाध्यमातून राबवला जात असल्याचा प्रत्यय आपल्याला येत आहे. यासोबतच भव्य स्वागत कमानीची देखील उभारणी करण्यात आली आहे आणि पिण्याच्या पाण्याची सोय, अल्पोपहार , फराळ व इतरही सुविधा वारकऱ्यांना कर्जत-जामखेड मतदारसंघात देण्यात येत आहेत.
सोबतच मतदारसंघांतून विविध दिंड्यांमध्ये सामील होणाऱ्या नागरिकांना पावसापासून बचावासाठी घोंगतेदेखील वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी आमदार रोहित पवार अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून वारकऱ्यांची सेवा करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न करत असतात. ज्याचा फायदा हा दरवर्षी हजारो वारकऱ्यांना होत असतो.