*नगर जिल्ह्यात कर्जत-जामखेड तालुक्यांचा डंका; पीकविमा उतरवण्यात मतदारसंघ दुसऱ्या क्रमांकावर*

*आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे मोफत पिक विमा उतरवण्यात आले; शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अभिनव उपक्रम*

कर्जत / जामखेड | खरिप हंगामातील पंतप्रधान पीकविमा योजनेमध्ये यंदा शेतकऱ्यांनी विक्रमी सहभाग नोंदवला आहे. यामध्ये विशेषतः कर्जत-जामखेड या तालुक्यांनी जिल्ह्यात बाजी मारली आहे. पाथर्डी नंतर कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाने सर्वाधिक पीकविमा अर्ज भरले आहेत. यंदा नगर जिल्ह्यात एकूण ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांनी अर्ज भरले आहेत त्यापैकी कर्जत तालुक्यातून १ लाख १६ हजार २५७ तर जामखेड तालुक्यातून ९४ हजार ५२७ शेतकऱ्यांच्या पीकाला विमा कवच मिळाले आहे. दोन्ही तालुक्यात एकूण २ लाख १० हजार ७८९ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे.

कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मतदारसंघात गावागावात जाऊन शेतकऱ्यांचे मोफत पीक विमा अर्ज भरुन घेतले. शेतकऱ्यांना कोणत्याही समस्येला सामोरं जावं लागू नये यासाठी आमदार रोहित पवार यांनी स्वत: आपली टीम व कार्यकर्ते यांना पाठवून शेतकऱ्यांच्या पीकांचा विमा भरुन घेतला तसेच सातत्याने प्रबोधन व अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे. काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी वेबसाईट हँग होत होती, तर काही ठिकाणी वीज नसल्याने पीकविमा भरायला अडचण येत असे यामुळे अनेक शेतकरी यापासून वंचित राहिले होते. त्यामुळे रोहित पवार यांनी अधिवेशन काळात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना विनंती करुन पीकविमा भरण्याची मुदत वाढवून घेतली.

नगर जिल्ह्यामध्ये ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे. कर्जत तालुक्यातील एकूण ६० हजार ०७९ हेक्टर तर जामखेड तालुक्यातील ५०, १२० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षण मिळाले आहे. नगर जिल्ह्यात खरिपाचे सरासरी ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर क्षेत्र असून यंदा ५ लाख ८० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. सततचा पाऊस, अतिवृष्टी, गारपीट व अन्य कारणाने शेतपिकांचे नुकसान झाले, तर भरपाई मिळावी यासाठी पंतप्रधान पीकविमा योजना राबवली जाते. यंदा राज्य शासनाने विमा हप्त्याचा भार उचलत शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा उतरवण्याची संधी उपलब्ध दिली. परंतु पिक विमा अर्ज भरत असताना शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च होत असतो त्यामध्ये प्रिंटिंग असेल फॉर्म भरण्यासाठी केंद्र सरकारला देण्यासाठीचे पैसे असतील त्यासाठी शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये व त्यांना काळजी करावी लागू नये म्हणून आमदार रोहित पवार यांनी हजारो शेतकऱ्यांना मदत करून गावातच मोफत पिक विमा उतरवण्यास मदत करून त्यांचा पिक विमा उतरवुन दिला आहे.

यंदा उशिराने पाऊस व उशिराने पेरण्या होऊनही पीकविमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. गतवर्षीच्या तुलनेत नगर जिल्ह्यात पाचपटीने अधिक शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले आहेत. गेल्यावर्षी केवळ सव्वादोन लाख शेतकरी सहभागी झाले होते. कृषी विभागातून दिलेल्या माहितीनुसार, यंदा जिल्ह्यातील १४ तालुक्यांत ११ लाख ७३ हजार ७४७ शेतकऱ्यांच्या ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टरवर क्षेत्रावर विमा उतरवला आहे. यापोटी सरकार विमा कंपन्यांना ४५२ कोटी ४६ लाख ९० हजार रुपयांचा विमा हप्ता देईल.

या रकमेतून ६ लाख ७७ हजार ५५३ हेक्टरसाठी ३ हजार ३२८ कोटी ७९ लाख रुपये संरक्षित झाले आहेत. यंदा पीकविम्यात पाथर्डी नंतर कर्जत, जामखेड तालुक्यांनी लक्षणीय सहभाग नोंदवल्याचे पाहायला मिळाले.

*प्रतिक्रिया*

सरकारी योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रबोधन करणे आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती नेणे फार महत्त्वाचे असते. माझी टीम, कार्यकर्ते व अधिकारी यांच्या मदतीने आम्ही कर्जत-जामखेडमध्ये हा उपक्रम राबवू शकलो. त्याचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होईल. यंदा पाऊस कमी असल्याने दुष्काळ पडण्याची देखील भीती व्यक्त केली जात आहे आणि अशा परिस्थितीत पिक विमा उतरवल्यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असं वाटतं.

– *आमदार रोहित पवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *