जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील खर्डा जामखेड रोडवर असलेल्या हाॅटेल पाटील येथील हॉटेल कामगाराचा खून करून त्याचे प्रेत पखरूड शिवारातील बेल्हेश्वर मंदिराच्या कमानी जवळील विहिरीत नेऊन टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सविस्तर असे की दि. १५ मे रोजी १२:०० ते १२:३० वाजताचे दरम्यान मौजे खर्डा येथील हॉटेल पाटील पॅलेस येथे व दि. १६ मे रोजी सायंकाळी ७:२५ वाजण्याचे पूर्वी वेळ निश्चित नाही मौजे पाखरूड शिवारातील बेलेश्वर मंदिराचे कमानी जवळील विहिरीत
यातील मयत अनिकेत संजय उदमले (वय २५) रा. आडगाव ता. पाथर्डी, (जात चांभार) हा गेल्या आठ ते दहा दिवसापासून खर्डा येथील हॉटेल पाटील पॅलेस येथे काम करीत होता. अनिकेत संजय उदमले हा हॉटेल मालक यास चंभार या जातीचा आहे हे माहीत असताना देखील त्यांनी अनिकेत यास हॉटेल मालक अक्षय कातोरे याने शिवीगाळ केली. तसेच यातील आरोपी 1) अक्षय कातोरे व त्याचा कामगार 2) भरत आगलावे या दोघांनी मिळून अनिकेत यास तंदूर भट्टीत टाकायची लाकडे हातात घेऊन मारहाण केली व तसेच दुसरा कामगार ३) शुभम एडके याने अनिकेत यास लाथा बुक्क्याने मारहाण केली. त्या मारहाणी मध्ये अनिकेत मयत झाला असल्याचे समजताच वरील तिघांनी मिळून संगणमत करून अनिकेतचा मृतदेह एका ब्लॅंकेट मध्ये गुंडाळून मौजे पाखरूड शिवारातील बेलेश्वर मंदिराचे कमानी जवळील विहिरीत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने आणून टाकून दिली.
यानुसार मयत अनिकेतचे वडील संजय विठोबा उदमले वय 48 व्यवसाय शेती रा आडगाव ता पाथर्डी जि अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरूनतसेच वरिष्ठांच्या आदेशाने अक्षय हनुमंत कातोरे रा खर्डा 2) भरत आगलावे रा ब्रह्मगाव ता आष्टी 3) शुभम येकडे राहणार बुलढाणा यांचे विरूद्ध उस्मानाबाद जिल्ह्य़ातील पोलीस ठाणे वाशी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 150/2023 भादवी कलम 302,201,34 सह 3(2)VA अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून गुन्हातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात वासी पोलीसांना यश आले असून आरोपींनी गुन्हाची कबुली दिली आहे.
खर्डा पोलीस स्टेशनचे
पोलीस नाईक संभाजी शेंडे ,
पोलीस कॉन्स्टेबल ,शेषराव मस्के व बाळासाहेब खाडे यांनी मयताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणुन तपासामध्ये वाशी पोलीसांना मदत केली आहे.
पुढील तपास वाशी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश. कळंब हे करीत आहेत.
ही खूनाची घटना कळालेनंतर खर्डा व परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खर्डा शहरात काही महिन्यांच्या अंतराने खुनाच्या घटना घडत असल्याने गुन्हेगारावर खर्डा पोलीसांचा वचक आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत असून खर्डा पोलीस स्टेशनला एका खमक्या अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी खर्डा व खर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व सामान्य नागरिक करत आहेत.
चौकट
सदर खूनाची घटना खर्डा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असली तरी आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेऊन टाकल्याने या घटनेचा तपास व कारवाई वाशी पोलीस करत आहेत